मुंबईः खर्च व्यवस्थापनावर केंद्रीत वित्तीय तंत्रज्ञान कंपनी झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडने व्यावसायिक कामगिरीत वाढीचा क्रम कायम ठेवला आहे. विशेषतः देशातील उद्योग जगताची मिळकत कामगिरी आणि भांडवली गुंतवणुकीचे प्रमाण लक्षणीय मंदावले असताना, झॅगलने सरलेल्या तिमाहीत नव-नवीन कंपन्यांना ग्राहकवर्गात सामावून घेतले आणि निव्वळ नफ्यात भरीव ५६ टक्क्यांची वाढ नोंदविली.

झॅगल ही देशातील वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) क्षेत्रातील अद्वितीय स्थानावर असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. खर्च व्यवस्थापन या मध्यवर्ती बिंदूभोवती ती विविध उत्पादने आणि सेवा प्रदान करते. ती तिच्या ग्राहकांना खर्च, देयके आणि बक्षीसे / उत्तेजनार्थ लाभ व्यवस्थापनातील सॉफ्टवेअर सेवा प्रदान करते. विशेषतः नियोक्ते आणि कर्मचारी यांतील दुवा या रूपात काम करताना, नियोक्त्यांकडून कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि वेतनेतर लाभ या बाबींची काळजी तिच्याकडून घेतली जाते.

गेल्या वर्षभरात दररोज जवळजवळ दोन नवीन ग्राहक मिळविणाऱ्या झॅगलने एकंदर मंदीचा हंगाम असूनही, सरलेल्या जून तिमाहीत हिंदुस्तान पेन्सिल, अपोलो हेल्थ, मो एंगेज, नोव्होझाइम्स, डीटीडीसी, सीके बिर्ला हेल्थकेअर आणि ट्रूकॉलर असे नवीन ग्राहक जोडले. सर्व महसूल प्रवाहांमध्ये वाढ नोंदवत तिने ३३२ कोटी रुपयांचा (वार्षिक तुलनेत वाढ ३२ टक्के) आणि ५६ टक्के वाढीसह २६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

चालू २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी तिने महसूल वाढीचे प्रमाण ३५ ते ४० टक्के राहिल, असे कंपनीचे अनुमान आहे. गुरुवारी तिमाही निकालाआधी झॅगलचा समभाग राष्ट्रीय शेअर बाजारावर १.८४ टक्के घसरणीसह ३६८ रुपयांवर बंद झाला.