Adani Group Shares Surge After Clean Chit in Hindenburg Case: ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (SEBI) नुकतेच अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेले स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत. अदाणी समूहाच्या कंपन्यांची चौकशी केल्यानंतर सेबीने अदाणी समूहाला क्लीन चीट दिली आहे. सेबीने दिलेल्या या क्लिन चीटनंतर शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सेबीला हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे अदाणी समूहाचा निर्णायक कायदेशीर विजय झाला आहे.

सेबीच्या या निर्णयानंतर, अदाणी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती बीएसईवर इंट्राडे ट्रेडमध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहे. यामध्ये अदाणी टोटल गॅसचा शेअर १३ टक्क्यांनी वाढून ६८७.३५ रुपयांवर पोहोचला आहे. तर अदाणी पॉवर ५२ आठवड्यांचा ६८६.९५ रुपये या उच्चांकावर पोहोचला आहे, जो इंट्राडे ट्रेडमध्ये ९ टक्क्यांनी वाढला आहे.

दरम्यान, अदाणी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर ६ टक्क्यांनी वाढून ८८४.३५ वर पोहोचला आहे, तर अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेली अदाणी एंटरप्रायझेस बीएसईवर इंट्राडे ट्रेडमध्ये ५ टक्क्यांनी वाढून २,५२७.५५ रुपयांवर पोहोचली आहे. अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन अनुक्रमे ५ टक्के आणि ३ टक्क्यांनी वाढले आहेत.

असे असले तरी, आजच्या जोरदार वाढीनंतरही, अदाणी समूहाचे शेअर्स त्यांच्या संबंधित ५२ आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा ५० टक्क्यांनी खाली आहेत.

अदानी विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरण

जानेवारी २०२३ मध्ये, अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने एक शॉर्ट सेलर रिपोर्ट प्रकाशित केला होता, ज्यामध्ये अदाणी समूहाच्या काही कंपन्यांविरुद्ध काही आरोप केले होते.

एक वर्षानंतर, ३ जानेवारी २०२४ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांमधील सर्व प्रकरणे निकाली काढली, ज्यात शॉर्ट सेलर रिपोर्ट मधील आरोपांशी संबंधित स्वतंत्र चौकशीचा समावेश होता. त्यावेळी न्यायालयाने दोन प्रलंबित प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्याची जबाबदाली सेबीला दिली होती.

आता, सेबीने गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी अदाणी समूहाच्या कंपन्या, समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी आणि संबंधित संस्थांविरुद्ध निधी वळवणे, व्यवहारांचे उल्लंघन आणि फसवणुकीच्या आरोपांविरोधातील कार्यवाही बंद केली.