मुंबईः सोमवारच्या मोठ्या आपटीनंतर मंगळवारी (२८ जानेवारी) सेन्सेक्स आणि निफ्टीने एक टक्क्यांपर्यंत फेरउसळी घेणारी दमदार तेजी दर्शविली. चीनच्या नवीनतम डीपसीक या कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील विकासाबद्दलच्या चिंतेने अमेरिकी बाजारांतील भीतीयुक्त पडझडीनंतरही आपल्या बाजारात ही तेजी आली आहे. बँकिंग व्यवस्थेत तरलता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांतून फेब्रुवारीत व्याजदरात कपातीबद्दल वाढलेल्या आशा यामागे निश्चितच आहेत. म्हणून मंगळवारच्या सत्रात बँकिंग आणि व्याजदराबाबत संवेदनशील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्साही खरेदी झाल्याचेही आढळून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजीमय वातावरणात, बीएसई सेन्सेक्स ५३५.२४ अंशांनी किंवा ०.७१ टक्क्यांनी वाढून ७५,९०१.४१ या पातळीवर दिवसअखेरीस स्थिरावला, तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक १२८.१० अंशांनी किंवा ०.५६ टक्क्यांनी वाढून २३,०४९.२५ वर बंद झाला. दिवसाच्या मध्यान्हीला दोन्ही निर्देशांक टक्क्यांहून अधिक वाढ साधून होते. सेन्सेक्सने तर ९०० अंशांच्या उसळीसह, ७६ हजारांपल्याड झेप घेतली होती. शेवटच्या तासाभरात काहीशी नफावसुली झाल्यामुळे निर्देशांक उच्चांकापासून निम्म्याने कमी होऊन बंद झाले.

बाजार तेजीचे मुख्य घटक

१. बँकांच्या शेअर्समध्ये खरेदीः

रिझर्व्ह बँकेने बँकांची तरलता स्थिती सुधारण्यासाठी टाकलेली पावले ही बाजारासाठी सुखद आणि आश्वासक ठरली. बँकांची तरलता स्थिती सुधारल्यानंतर व्याजदर कपातीचा दिलासादायी नजराणाही रिझर्व्ह बँकेकडून दिला जाईल, असा विश्लेषकांचा होरा आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर, ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान होत पतधोरण बैठकीतील निर्णयाबाबत त्यामुळे आशा उंचावल्या आहेत. परिणामी निफ्टी बँक निर्देशांकांत २ टक्क्यांची तेजी दिसली, तर एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक सारख्या खासगी बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. एलआयसी हाऊसिंग फायनान्स, बजाज फायनान्स आणि महिंद्र अँड महिंद्र फायनान्शियल सर्व्हिसेससह या अन्य व्याजदराबाबत संवेदनशील शेअर्समध्येही दीड टक्का ते ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

२) ‘डीपसीक’च्या भीतीवर मात:

चीनने त्यांचे डीपसीक आर१ हे कृत्रिम प्रज्ञा (एआय) प्रारूप प्रस्तुत केल्यानंतर सोमवारी जागतिक बाजारपेठेने त्याचा जबर धसका घेणारी प्रतिक्रिया दिली होती. ज्यातून तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये दणाणून विक्री झाली. याच चिंतेमुळे अमेरिकी बाजारात एस अँड पी दीड टक्क्यांनी घसरला, तर नॅस्डॅक १०० निर्देशांक ३ टक्क्यांनी गडगडला. मात्र चीनच्या या नवतंत्रज्ञान मुसंडीचा भारतीय आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर थेट परिणामाची शक्यता नसल्याने, स्थानिक बाजारात आश्वस्तता दिसून आली. त्यामुळे मंगळवारच्या सत्रात आघाडीच्या आयटी कंपन्यांत झालेल्या खरेदीने त्यांचे शेअर्स चांगलेच वाढले.

३. विक्रीमुळे भाव खालावलेल्या शेअर्समध्ये खरेदी

गेल्या तीनेक महिन्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीने निदान आघाडीच्या लार्जकॅप शेअर्सबाबत तरी मूल्यांकनाची चिंता राहिली नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मूल्यांकन वाजवी पातळीवर आले इतकेच नाही, तर अनेक लार्जकॅप शेअर्स आता आकर्षक भावात उपलब्ध असल्याने त्यांना खरेदीचे पाठबळ मिळाले.

अस्थिरतेचा पाठलाग मात्र सुरू राहणार!

चालू आठवड्यात दोन प्रमुख घटनांची शेअर बाजारातील व्यवहारांवर छाया राहिल. एक म्हणजे, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प (१ फेब्रुवारी) आणि दुसरा, अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचा व्याजदरासंबंधी निर्णय (२९ जानेवारी) हे बाजाराची दिशा निश्चित करतील. या महत्त्वाच्या घडामोडींबाबत जोवर साशंकता आहे, तोवर मोठ्या चढ-उतारांसह बाजारावर अस्थिरतेचे सावट कायम राहिल, असे जिओजित फायनान्शिय सर्व्हिसेस मुख्य गुंतवणूक-धोरणकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

सेन्सेक्स-निफ्टीत टक्क्यांहून मोठी वाढ झाली असतानाही, गेल्या काही दिवसांप्रमाणे व्यापक बाजारावर विक्रीचा जोर दिसून आला. परिणामी तेजीच्या बाजारातही बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६१ टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १.७७ टक्क्यांपर्यंत घसरला. निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी फिन सर्व्हिसेस, निफ्टी रिअल्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक या व्याजदर कपातीचे लाभार्थी क्षेत्रात दीड ते अडीच टक्क्यांची वाढ झाली. त्या उलट निफ्टी एनर्जी, आयटी, मेटल, मीडिया आणि फार्मा या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात ९९६ शेअर्स वधारले, तर १,५७७ शेअर्स घसरले.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay stock exchange update sensex jumps by 900 points print eco news asj