मुंबई : निर्देशांकातील रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या वजनदार कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांकात अखेरच्या तासात तेजी संचारली. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या सत्रातील नीचांकी पातळीवरून सावरत सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २७१.५० अंशांनी वधारून ७१,६५७.७१ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान निर्देशांकाने ७१,११०.९८ अंशांचा नीचांक तर ७१,७३३.८४ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७३.८५ अंशांची भर पडली आणि तो २१,६१८.७० पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवरील कमकुवत कलाचे प्रतिकूल पडसाद देशांतर्गत बाजारावर उमटले. कोणत्याही ठोस कारणाच्या अभावी बाजाराला निश्चित दिशा प्राप्त झालेली नाही. मात्र नजीकच्या काळात अमेरिका आणि देशातील किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर होणार असल्याने त्यांनतर बाजाराला दिशा मिळू शकते. दुसरीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष कंपन्यांच्या सरलेल्या तिमाहीतील कमाईच्या हंगामाकडे लागले आहे. वाहन, भांडवली वस्तू आणि सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांची कमाई चांगली राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सर्वाधिक तेजीत होता. तो २.६९ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, विप्रो, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन यांचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले. दुसरीकडे एनटीपीसी, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, इन्फोसिस आणि नेस्लेच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या सत्रात ९९०.९० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७१,६५७.७१ २७१.५० ( ०.३८)

निफ्टी २१,६१८.७० ७३.८५ ( ०.३४)

डॉलर ८३.०२ -११

तेल ७७.४४ -०.१९

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex gains 271 points today on 10th january print eco news asj