गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्राने फार मोठी उंची गाठली आहे. ऑलिम्पिक, विविध खेळांचे विश्वचषक, आशियाई, युरोपियन, आफ्रिकन, इत्यादी अनेक स्पर्धा दर्जेदारपणे होत आहेत. खेळाची आणि खेळणाऱ्यांची संख्या जितक्या मोठय़ा प्रमाणात वाढते आहे, तितक्याच प्रमाणात यातील व्यवस्थापनाची गरजसुद्धा अधोरेखित होत आहे. क्रीडाविषयक उपक्रमाचे किंवा स्पध्रेचे आयोजन करण्यासाठी योग्य पद्धतीने निश्चित कालमर्यादेत त्याचे नियोजन करणे, यालाच क्रीडा व्यवस्थापन असे म्हणता येईल. २०१४च्या फिक्कीच्या अहवालानुसार २०२५मध्ये भारतात २३ लाखांपेक्षा जास्त क्रीडा व्यवस्थापकांची गरज निर्माण होणार आहे. देशात ५२ खेळांच्या राष्ट्रीय संघटना कार्यरत आहेत. या संघटनांना येत्या काही वर्षांत क्रीडा व्यवस्थापनाची ज्ञात असलेली बरीच गुणवत्ता लागणार आहे. त्यामुळेच हे क्रीडा व्यवस्थापन म्हणजे नेमके काय, ते पाहू.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय या स्पर्धा जशा वर्षांनुवष्रे होतात, तशाच विविध खेळांच्या लीगसुद्धा होत असतात. जगभरात फुटबॉल, एनबीए, आदी खेळांच्या अनेक लीग अस्तित्वात आहेत. भारताविषयी विचार करायचा झाल्यास आठ वर्षांपूर्वी आलेल्या इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेनंतर खेळाच्या बाजारपेठेला सुगीचे दिवस आले आहेत. यानंतर आता विविध खेळांच्या लीग वर्षभर चालू असतात. त्यामुळे स्वाभाविकपणे क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींची गरज वाढली आहे. याचप्रमाणे क्रीडा विपणन, ब्रँडिंग, आदी गोष्टींकडे लक्ष देण्यासाठीसुद्धा ही मंडळी उपयुक्त ठरतात. महेंद्रसिंग धोनीप्रमाणे अनेक खेळाडूंच्यासुद्धा या प्रकारच्या कंपन्या अस्तित्वात आहेत.

कुठे संधी मिळतील?

संघव्यवस्थापक, संचालक, एजंट्स, नेमणूक अधिकारी, विपणन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी, कार्यक्रमांचे नियोजन (इव्हेंट मॅनेजमेंट), क्रीडा साहित्यासंदर्भात, क्रीडा ब्रँडिंग, क्रीडा पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशी काही महत्त्वाची कार्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यक्ती करू शकते.

पात्रता

व्यावसायिक पद्धतीने खेळाशी निगडित व्यवस्थापन करू शकणाऱ्या व्यक्ती या करिअरच्या वाटेने निर्माण होतात. या व्यक्तींमध्ये अचूक नियोजन, नेतृत्व, निर्णयक्षमता, विश्लेषण, अचूक मूल्यांकन, कल्पकता, धडाडी, समयसूचकता, संवादकौशल्य, सर्वसमावेशकता हे गुण आवश्यक आहेत. काही ठिकाणी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमसुद्धा आता उपलब्ध आहेत. याशिवाय पदवीनंतरचे अभ्यासक्रमसुद्धा देशभरात उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतील पदवी ही जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पात्रता असली तरी वाणिज्य शाखेतील किंवा खेळाशी निगडित व्यक्ती या क्षेत्रात अधिक उत्तमपणे कारकीर्द घडवू शकतो.

प्रशिक्षण अभ्यासक्रम

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (आयआयएसएम), जयहिंद कॉलेज, मुंबई</p>

बीएसएम (३ वष्रे) – पात्रता : बारावी

एमएसएम (२ वष्रे) – पात्रता : पदवी

पीजीपी (१ वष्रे) – पात्रता : पदवी

नॅशनल अकादमी ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (एनएएसएम), मालाड (पूर्व), मुंबई

एमबीए (२ वष्रे) – पात्रता : पदवी

बीबीए (३ वष्रे) – पात्रता : बारावी

पीजीडीएसएम (१ वष्रे) – पात्रता : पदवी

डीएसएम (१ वष्रे) – पात्रता : बारावी

महाराष्ट्राबाहेरील अभ्यासक्रम

अलगप्पा विद्यापीठ, करायकुडी, तामिळनाडू

पीजीडीएसएम (१ वष्रे) – पात्रता : पदवी

इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्स, नवी दिल्ली

पीजीडीएसएम (१ वष्रे) – पात्रता : पदवी

इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल वेल्फेअर अँड बिझनेस मॅनेजमेंट, कोलकाता

पीजीडीएसएम (१ वष्रे) – पात्रता : पदवी

प्रशांत केणी