विवेक वेलणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्ट्स, कॉमर्ससायन्स सह विविध शाखांमध्ये बारावी उत्तीर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रापासून कॉम्प्युटर सायन्सपर्यंत आणि गणितापासून इंग्रजी पर्यंत विविध विषयांवर डिग्रीसाठी प्रवेश घ्यायचा असतो. देशातील शेकडो विद्यापीठ व संस्थांमध्ये डिग्रीचे कोर्सेस उपलब्ध आहेत, मात्र या प्रत्येक विद्यापीठात वा संस्थेत यासाठी अर्ज करणे, त्यांच्या प्रवेश परीक्षा देणे हे विद्यार्थ्यांना जिकिरीचे होते. यावर उपाय म्हणून देशातील केंद्रीय विद्यापीठे व इतर अनेक विद्यापीठे/ संस्थांमध्ये डिग्री प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे एक राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि यातील स्कोअर च्या आधारावर देशभरातील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी पासून जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी पर्यंत ची ४४ केंद्रीय विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे तसेच गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या अनेक ख्यातनाम संस्थांमध्ये डिग्री साठी प्रवेश मिळतो.

अगदी ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना एका पातळीवर येऊन एकाच परीक्षेतून स्वत:ला सिद्ध करत देशातील विविध विद्यापीठे/ संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशाने ही राष्ट्रीय स्तरावरील सीईटी सुरू करण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा १५ मे ते ३१ मे या दरम्यान देशभरातील ३२४ केंद्रांवर घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी सह ४१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी सह १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षा बारावीच्या सिलॅबस वर आधारित असते.

ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड तसेच पेपर पेन्सिल अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाणार असून त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी पाच मार्क दिले जातात तर चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क वजा केला जातो. विद्यार्थ्यांना एकूण ६१ विषयांपैकी जास्तीत जास्त ६ विषयांची परीक्षा देता येते. यामध्ये एक पेपर जनरल टेस्ट चा असतो ज्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, लॉजिकल रीझनिंग या विषयांवर प्रश्न असतात. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, जनरल टेस्ट हे दोन पेपर नक्की द्यावेत कारण गोखले इन्स्टिट्यूटसह अनेक संस्थांमध्ये या दोन पेपरमधील मार्कांवरच प्रवेश दिला जातो.

या परीक्षेसाठी अर्ज https:// exams. nta. ac. in/ CUET- UG या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने २६ मार्च २०२४ पर्यंत करता येतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अॅडमिट कार्ड मिळेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission step article about for admission to degree courses carrer amy