मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन , पुस्तकेही मोफत व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि दीड लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारे महाविद्यालय भारतात आहे, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. भारतीय नौदलामध्ये लागणारे अभियंते घडवण्यासाठी सैन्यदलांमार्फत हे महाविद्यालय चालवले जाते.
बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा आहे. मात्र यासाठी भरमसाठ फी देऊनही हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सातत्याने भेडसावत असते. आणि त्यानंतरही चांगली नोकरी मिळेल का याचीही काळजी सतावत असते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन , पुस्तकेही मोफत व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि दीड लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारे महाविद्यालय भारतात आहे, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. भारतीय नौदलामध्ये लागणारे अभियंते घडवण्यासाठी सैन्यदलांमार्फत हे महाविद्यालय चालवले जाते. या महाविद्यालयाचे नाव आहे काॅलेज ऑफ नेव्हल इंजिनीअरिंग. केरळमधील एझिमला या ठिकाणी हे महाविद्यालय आहे.
पात्रता
एकूण कोर्स चार वर्षांचा असून विद्यार्थ्यांना अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन , मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखांमध्ये शिक्षण घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळते. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नौदलात लेफ्टनंट म्हणून सामावून घेतले जाते. त्यांना लेफ्टनंट म्हणून सुरुवातीचा पगार साधारणपणे दीड लाख रुपये महिना मिळेल. या महाविद्यालयात प्रवेशासाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे. www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पध्दतीने ३० जून ते १४ जुलै २०२५ या दरम्यान अर्ज करता येतील.
ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख २ जुलै २००६ आणि १ जानेवारी २००९ या दरम्यान आहे असे विद्यार्थी / विद्यार्थिनी यासाठी अर्ज करु शकतील. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या तीन विषयात मिळून किमान ७० % गुण असतील ते हा अर्ज भरू शकतील. आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून JEE (Mains) च्या मार्कांच्या आधारावर राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०२५ मध्ये बंगळुरू , भोपाळ , कोलकता विशाखापट्टणम यापैकी एका ठिकाणी समक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाते.
प्रवेशासाठी मुलाखत
या महाविद्यालयातील प्रवेशासाठी मुलाखत , ज्याला SSB interview म्हणतात, हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही मुलाखत प्रदीर्घ म्हणजे पाच दिवसांची असते, त्यात दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी , पिक्चर पर्सेप्शन टेस्ट आणि डिस्कशन टेस्ट होते. यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये प्रवेश मिळतो. यामध्ये मानसिक चाचणी , वैयक्तिक आणि ग्रुप टास्कच्या परीक्षा होतात, यात शेवटी वैयक्तिक मुलाखत होऊन अंतिम निवड यादी जाहीर होते.
SSB मुलाखतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला जातो. यात यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने इंग्रजी भाषेवर व संभाषणावर प्रभुत्व मिळवणे, सामान्यज्ञान वाढवणे , आत्मविश्वासपूर्वक वागणे, बोलणे आवश्यक असते. या मुलाखतीतून तावून सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. वैद्यकीय तपासणीमध्ये नाक, कान, घशापासून सर्वांगीण तपासणी होते. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या काय गोष्टी वैद्यकीय तपासणीमध्ये बघितल्या जातात यासंबंधीचे चार पानी निवेदन joinnindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये अगदी वय, वजन, उंची या कोष्टकापासून ते टॅटू कुठे काढला तरच चालू शकतो येथपर्यंत सविस्तर माहिती आहे.
इच्छुक विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी या सर्व गोष्टी अर्ज करण्याआधीच एखाद्या डाॅक्टरकडून तपासून घेणे फायद्याचे ठरते म्हणजे आपण या पात्रतेत बसतच नसू तर अर्ज करावा की नाही याचा निर्णय आधीच घेता येईल जेणेकरून नंतरची निराशा टाळता येते. वैद्यकीय तपासणीनंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांत प्रवेश दिला जातो. कोर्स १ जानेवारी २०२६ ला सुरू होईल. भारतीय नौदल जगातील सर्वोत्तम नौदलांपैकी एक असून विमानवाहू युद्धनौकांपासून ते पाणबुड्यांपर्यंत अत्याधुनिक ताफा नौदलाच्या सेवेत आहे. इंजिनीअर्सना नौदलामध्ये जहाजबांधणी पासून ते देखभाल दुरुस्तीपर्यंत विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. विनामूल्य शिक्षण, उत्तम पगाराची व सोयीसुविधांची नोकरी आणि त्याचबरोबरीने देशसेवेची उत्तम संधी मिळवून देणार्या या पर्यायाचा विद्यार्थ्यांनी जरुर विचार करावा.