‘स्त्रीत्वाच्या कल्पना बदलत असताना पुरुषत्वाच्या कल्पना बदलणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या टप्प्यावर बदलत्या पुरुषत्वाच्या मर्दानगीच्या कल्पना त्यांचे ताणेबाणे याचा विचार पुरुषांनीही करणे गरजेचे आहे.’
पुणे येथे ‘मर्दानगी’ या विषयावर चर्चा करण्यासाठी नुकतीच ‘पुरुषभान परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने ‘मर्दानगी’ या विषयाची चर्चा करणारा लेख.
जुन्या मित्रांची टोळकी जमली की त्या वेळच्या आठवणी निघतात, शाळेमध्ये मित्राला बुळ्या म्हणणं.. शिवाजी महाराजांविषयीचे व्याख्यान ऐकून स्फुरण चढणं.. फुशारक्या मारत यात्रेत मुलींना धक्के मारत जाणं.. मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी केलेली मारामारी.. वाढत्या वयात मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये कॉफी प्यायला गेल्यावर बिल देण्याचं दडपण.. हे असले चिक्कार अनुभव प्रत्येकच पिढीला सांगता येतील. यातल्या बऱ्याचशा अनुभवांची कारणमीमांसा करण्याचं ते वय नसतंच. ते सर्व ‘पुरुष’ म्हणून करायचं असं
या ‘मर्दानगी’ची व्याख्या करायची तर मर्दानगी म्हणजे पुरुष असण्याच्या समाजनिर्मित आणि रुजलेल्या कल्पना, गुणवैशिष्टय़ं. ‘मर्दानगी’ म्हणजे समाजातील पुरुषांनी अंगीकारलेली एक व्यवहार पद्धती आहे. या मर्दानगीबरोबर काही शब्द हमखास येतात, उदा- तगडा, दबंग, बहादूर, गरम रक्ताचा, निधडय़ा छातीचा, जिगरबाज इत्यादी. पुरुषांच्या संदर्भातच समाज ही विशेषणं वापरताना दिसतो, याउलट ‘बायकी’ म्हणून काही गुण स्त्रियांना लावलेले दिसतात, मग लाजाळू, नाजूक प्रवृत्तीच्या पुरुषांची चेष्टा होते.
गेल्या ३०-४० वर्षांमध्ये स्त्री चळवळीने पुरुषप्रधान व्यवस्थेविषयीचं भान सर्व समाजाला दिलं आहे. स्त्री स्वत: शोषित असल्यामुळे तिच्यावरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विविध प्रकारे संघटित झाली. रस्त्यावर उतरून आंदोलनं, कोर्टकचेरी – कायदेबदल तसंच सामाजिक संस्था- संघटना बांधणी, जाणीव जागृती अशा अनेक मार्गाने चाललेल्या स्त्री-चळवळीने स्त्री-भान जागवण्याचा महत्त्वाचा टप्पा याआधीच पार केला आहे. कुटुंबात स्त्रीचं स्थान पूर्वीपेक्षा भक्कम झालं आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकारणातही स्त्रियांचा सहभाग वाढताना दिसतोय. स्त्रीला तिच्या होत असलेल्या शोषणाची पुरेशी जाण आलेली दिसते. या पाश्र्वभूमीवर ‘सावित्री आहे घरोघरी, जोतिबाचा शोध जारी’ ही राजसत्ताक आंदोलनाने दिलेली घोषणा बरंच काही सांगून जाते. ‘स्त्रीत्वा’च्या पारंपरिक कल्पना काही प्रमाणात कोलमडून पडताना दिसताहेत. स्त्रियांची परंपरागत क्षेत्रं म्हणजे स्वयंपाकघर, नोकरीचं क्षेत्र- शिक्षिका, बँका, कारकुनी, रिसेप्शन, नर्स-आया, सॉफ्टवेअर, डॉक्टरकीही सोडून इतर क्षेत्रांतही त्यांनी पदार्पण केलं आहे. त्यामुळे स्त्रीत्वाच्या कल्पना बदलत असताना पुरुषत्वाच्या कल्पना बदलणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या टप्प्यावर बदलत्या पुरुषत्वाच्या- मर्दानगीच्या कल्पना त्यांचे ताणेबाणे याचा विचार पुरुषांनीही करणं गरजेचं आहे.
स्त्री-चळवळीचा लढा हा पितृसत्ताक पद्धतीविरुद्धचा लढा आहे. या पितृसत्तेला पोसण्याचं काम ‘मर्दानगी’ करते. पुरुषाला सत्ताधारी, आक्रमक आणि हिंसक रूपात प्रस्थापित करणारी, समाजमान्यता देणारी ती एक सामाजिक परिभाषा आहे. राखी बांधून आश्वासन देणारा भाऊ हा प्रत्यक्षात स्त्रीचं रक्षण करतो किंवा करू शकतोच असं नाही. झुपकेदार मिश्या वाढविणारा पुरुष सामान्य पुरुषांपेक्षा वेगळं कर्तृत्व दाखवणारा असतोच असं नाही. हातात कडं घालणारा, बोटात अंगठय़ा घालून फिरणारा गुंठापती हा शारीरबळात किंवा बुद्धिबळात श्रेष्ठ असतोच असं नाही. त्या अर्थाने ‘मर्दपणा’च्या खुणा या श्रेष्ठत्वाचा भ्रम निर्माण करतात, दडपण तयार करतात. या मर्दानगीच्या कल्पना महाराष्ट्रात वेगळ्या, बिहारमध्ये वेगळ्या आणि तामिळनाडूत वेगळ्या होत जातात. त्यामुळे ‘मर्दानगी’च्या खुणा शोधत असताना त्याच्या विभिन्न स्वरूपाकडेही पाहायला हवं. गाव जत्रेतली बैलगाडी शर्यत, कोंबडय़ांची लढत, कुस्ती हे महाराष्ट्रातले मर्दानी खेळ म्हणून पुढे येतात तर केरळमध्ये ही गोष्ट वेगळं रूप घेतं. इथल्या स्त्री-अभ्यासामुळे याची काही रूपं पुढं आली आहेत परंतु त्याचबरोबर वाढत्या जागतिकीकरणात ‘मर्दानगी’ कोणतं रूप घेते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. जागतिक पातळीवरच्या या कल्पना देशी अथवा स्थानिक पातळीवर किती परिणाम करतात याचा अभ्यास अजून फारसा पुढे आलेला नाही. सद्य:स्थितीत वर्चस्ववादी मर्दानगी तीन पातळ्यांवर पाहता येईल .
१) स्थानिक पातळीवर : म्हणजे घराघरातील, स्त्री-पुरुषांमध्ये, पुरुष-पुरुषांमध्ये, स्थानिक संस्थांमध्ये आणि गटा-गटांत त्याचं वेगळं रूप दिसतं. भारतीय संदर्भात जात आणि वर्गवार गटांमध्ये हे रूप कसं असतं हे पाहावं लागेल.
२) प्रदेशानुसार बदलतं रूप : मर्दानगीचं हे रूप सांस्कृतिक अथवा राष्ट्र-धर्म-भक्ती या स्वरूपात दिसतं. त्या प्रदेशातील राजकारणामध्ये, संस्था व्यवहारांमध्ये याचं रूप दिसतं.
३) जागतिक पातळीवर : आंतरराष्ट्रीय दबावगट, त्यांचं युद्धखोर राजकारण, निर्वासितांचे प्रश्न, मोठे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार, माध्यमांचं राजकारण यामध्ये मर्दानगीची रूपं दिसतात. वैश्विक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर मर्दानगीच्या कल्पनांचा प्रादेशिक पातळीवर परिणाम होत असतो आणि प्रादेशिक पातळीवरच्या ‘पुरुषत्वाच्या’ कल्पना स्थानिक पातळीवरच्या राजकारणासाठी रोल मॉडेल म्हणून काम करतात. उदारणार्थ, आपण प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरच्या पुरुषत्वाच्या कल्पनांचा विचार करू. चित्रपटकथा, चित्रपटातले नायक, खलनायक, नायिका तसंच राष्ट्रीय खेळाडू, त्यांचं सार्वजनिक जीवनातील वागणं, राजकारणी-नेते त्यांच्या राजकीय खेळी, भाषणं या गोष्टी स्थानिक पातळीवरच्या ‘मर्दपणा’च्या कल्पनांची निर्मिती करतात. प्रादेशिक पातळीवरच्या या वर्चस्ववादाच्या कल्पना आणि रीती, स्थानिक पातळीवरच्या कल्पनांना- रीतींना रोजच्या व्यवहारांना ‘मर्द’पणाची चौकट पुरवतात. गेली काही र्वष राजकारण्यांच्या वेशभूषेतही फरक पडतो आहे. सोनेरी आमदार म्हणून गौरविलेले राजकारणी दागिन्यांनी मढलेले असायचे तर आता सर्वच राजकारण्यांच्या गळ्यात सोन्याची चेन, हातात महागडा मोबाइल, उंची जॅकेट असं त्याचं रूप झालं आहे. शिवराळ भाषा हाही या राजकारणाचा महत्त्वाचा पोत आहे. त्यातून जनतेच्या मनात एक दबदबा निर्माण होतो. शिवाजीचा उल्लेख एकेरी न करता ‘शिवाजी महाराज’ म्हणायला सांगणं यातही हेच राजकारण दडलेलं दिसतं. या मर्दानगीचा विचार करताना आजच्या संदर्भात मोदींनी ‘५६ इंच’ छातीचा केलेला उल्लेखही महत्त्वाचा आहे.
पितृसत्ताक पद्धत ही स्त्री-शोषणाची व्यवस्था आहे आणि पितृसत्ताकता आणि मर्दानगी याचा घनिष्ठ संबंध आहे. परंतु त्या एक नाहीत. पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ असतो यावर आधारित व्यवस्थेला आपण ‘पितृसत्ताक’ व्यवस्था म्हणतो तर ‘मर्दानगी’ किंवा ‘पुरुषत्व’ यात हा संदर्भ फक्त स्त्री-पुरुष नात्याशी नसून पुरुष – पुरुषांमधील नात्यासंदर्भातही या कल्पनांचं महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ‘पुरुषप्रधान’ व्यवस्था स्त्री-पुरुष संबंधात पुरुषाला श्रेष्ठत्व देते आणि मर्दपणा किंवा पुरुषत्व हे पुरुषाला अधिक ‘श्रेष्ठ पुरुष’ ठरवते. हे श्रेष्ठत्वाचं पद अढळ नसतं. श्रेष्ठत्व हा त्याच्या भोवतीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शारीरिक घडामोडींचा परिणाम असतो. त्यामुळे हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी त्याला सतत परीक्षेला सामोरं जायला लागतं. त्यातून ‘मर्दानगीच्या’ कल्पना बदलत राहतात आणि पुरुषाला सतत श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. लष्करातला जवान हा आता ‘रिअल मॅन’ नाही. शिक्षकी पेशातल्या पुरुषाला आता लग्नाच्या बाजारात किंमत नाही आणि शेतकऱ्याला किंमत आणि प्रतिष्ठाही नाही. कालचा बाजार हा आजचा नाही. समाजात, कामाच्या जागी, कुटुंबात आणि स्त्री-पुरुष नात्यांत ही कुरघोडी अनिवार्य ठरते. ‘जेते’ असावं लागतं किंवा तसा आव आणावा लागतो.
स्त्री-पुरुष लैंगिक संबंधात पुरुषाचं श्रेष्ठत्व गृहीत असल्याने ‘लिंग मोठं असणं म्हणजे चांगलं’, ‘अधिक काळ संभोगक्रिया करणं’, ‘अधिक जोरकस असणं’ या कल्पना बाळगल्याने कामक्रीडेला लढाईचं स्वरूप येतं आणि पुरुष स्वत:चं जेतेपण जाहीर करतो. हे जेतेपद संशयातीत नसतं त्यामुळे त्या कामक्रीडेमध्ये हिंसा येऊ शकते. ही हिंसा सत्ता आणि श्रेष्ठत्व टिकवण्याचा मार्ग असतो. त्यामुळे ‘योनीशुचिता’सारख्या कल्पना श्रेष्ठत्व टिकवण्याच्या व्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मर्दपणाच्या आणि पुरुषत्वाच्या बऱ्याच कल्पनांचा संबंध हा लैंगिक कामक्रीडेशी, संभोगाशी असतो. अनोळखी आणि ओळखीच्याही माणसांना त्यांच्या आई-बहिणींवरूनच्या शिव्या, या जबरी संभोगाशी संबंधित असतात. त्यामुळेच ‘स्त्रीत्वा’च्या कल्पना या पुरुषत्वाच्या कल्पना टिकवण्यासाठी गरजेच्या असतात. स्त्रीत्व हे पुरुषत्वाच्या विरोधी नसतं तर ते पूरक असतं आणि त्यात पुरुषत्व श्रेष्ठ, स्त्रीत्व हे कनिष्ठ अशी उतरंड असते.
..हीच गोष्ट आपल्याला प्रादेशिक पातळीवरच्या सिनेमांमधून येणाऱ्या मर्दपणाच्या कल्पनांमध्ये दिसते. नव्वद सालातला केसाळ छातीचा अनिल कपूर आणि नंतरचा टपोरी आमिर खान हाच गावातल्या टोळक्याचा हिरो असतो, तरीही त्या मर्दपणाच्या कल्पना स्थानिक पातळीवर जशाच्या तशा अनुकरण केलेल्या नसतात. तिथल्या सामाजिक व इतर घटकांच्या परिणामांमुळे त्याची विविध रूपे दिसतात. मर्दपणाचा आणि व्यसनांचा संबंधही आहे. दारू पिणे, सिगारेट ओढणे या गोष्टी मर्दपणाशी जोडल्या जातात. दारू पिणे ही निव्वळ मर्दपणाची गोष्ट नसते, तिला इतरही अंगे असतात त्यामुळे बहुविध प्रकारच्या पुरुषत्वाच्या कल्पना स्थळ-काळाप्रमाणे दिसतात. नव्वद सालातल्या केसाळ अनिल कपूरची जागा दोन हजार साली छाती साफ ठेवणारा दबंग सलमान खान घेतो. यात पुरुषत्वाचे रूप बदलते, परंतु हे बदललेले स्वरूप पितृसत्तेला आव्हान देत नाही किंवा बदलवतही नाही. भारतातील स्थानिक पातळीवरच्या पुरुषत्वाच्या कल्पनांचा इथल्या जात वास्तव, धर्मकारणाशीही जवळचा संबंध आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्येने त्यांना अग्नी दिला परंतु त्यासंदर्भात इथल्या सनातनी धर्मवाद्यांनी निषेधाची भाषा करत, हा हक्क पुरुषास द्यावा, असे धर्म सांगतो अशी पोथीनिष्ठा दाखवली होती. त्यामुळे असे अनेक विशेषाधिकार पुरुषाला देणारी जात, धर्मव्यवस्था पुरुषत्वाच्या कल्पनांना आधार देते. हिंदू-मुस्लिम प्रेमविवाह, जातीबाहेरचे विवाह, दंगली यासाठी मर्दानगीची भाषा विविध अस्मिता जागवताना हत्यार बनते.
या मर्दानगीच्या कल्पना अस्तित्वात राहण्यासाठी काही क्षेत्रे, व्यवहार हे फक्त पुरुषांच्या हातात ठेवले जातात किंवा त्या पद्धती स्त्रियांना अवलंबायला अडसर निर्माण केला जातो किंवा त्यामध्ये स्त्रीचा अपमान केला जातो. उदाहरणार्थ, कुस्तीचे मैदान पुरुषांनीच मारायचे असेल तर स्त्रियांना त्यापासून रोखायला लागेल. बलात्कारामध्ये पुरुष स्त्रीचा ताबा मिळवतो आणि अपमानही करतो म्हणून बलात्कार, छेडछाड, अश्लील हावभाव पुरुषी व्यवस्थेमध्ये ‘मर्दुमकी’ ठरतात. त्याच वेळेस काही बलात्कार म्हणजे एका गटाच्या पुरुषांची दुसऱ्या गटावरची कुरघोडी असते. म्हणून सामूहिक बलात्कार, दंगलीतले बलात्कार हे मर्दुमकी म्हणून छुप्या पद्धतीने गौरविले जातात. या मर्दानगीमध्ये कुरघोडी असते त्यामुळे मर्दानगी ही एकजिनसी असत नाही. ती नवे नवे रूप धारण करत राहते. त्यामुळेच सत्ता संबंधाचे सुलभीकरण करत या मर्दानगीकडे पाहणे धोक्याचे ठरते. यात पुरुषांच्या काही गटांचे राजकारण असते तसेच स्त्रियांच्या गटांचेही हितसंबंध असतात. म्हणूनच बायकोच्या मुठीतल्या नवऱ्याला त्याची आईच बायल्या ठरवते आणि गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये बलात्काराबाबत भिन्नधर्मीय स्त्रिया परस्परविरोधी भूमिका घेताना दिसल्या.
वैश्विक पातळीवर आर्थिक बदल, आर्थिक गळचेपी, लोकांचे पर्यटन आणि इतर देशांत स्थायिक होणे, बहुद्देशीय उद्योगांचे विक्री तंत्र, युद्धखोरीची भाषा, विकासाच्या नवीन कल्पना या घडामोडींचा प्रादेशिक पातळीवरील ‘मर्दानगी’च्या कल्पनांवर प्रभाव पडतो. युरोपीय देशातील समलैंगिक संबंधांना मिळत असलेल्या मान्यतेमुळे भारतातही काही बदल होत आहेत. काही शारीरिक हालचाली, ठेवण, कपडय़ांच्या रंगातील स्टाइल, विविधता या बाबतीत पुरुषांना अधिक खुलेपणा अनुभवायला मिळतो आहे. त्यामुळे मर्दपणाच्या कल्पना बदलताहेत. नवा शहरी पुरुष (मेट्रो सेक्शुअल मॅन) दिसू लागला आहे. बाह्य़ स्वरूपातील लैंगिक फरक कमी होतो आहे, तरीही या खुलेपणामुळे, बदलांमुळे पुरुषसत्ताकारणावर फारसा फरक पडत नाही. असे काही बदल निश्चितपणे काही अंतर्विरोध निर्माण करतात.
बारा तास नोकरीवर जाणाऱ्या जोडप्यास खाण्याच्या सवयी, स्वयंपाकाची जबाबदारी, तिचे/ त्याचे इतर मित्र-मैत्रिणीशी संबंध, स्त्रीच्या स्वकमाईमुळे निर्णयस्वातंत्र्य इत्यादी बदल घडतात. मर्दानगीच्या कल्पनांना प्रतिप्रश्न केला जातो. पुरुषत्वाची नवी कल्पना जन्माला येते. वर्चस्वाच्या मर्दानगीच्या कल्पना बदलतात आणि अधिक सुसह्य़ कल्पना स्थिरावतात.
मर्दानगीच्या कल्पनांना झुगारणे हा प्रस्थापित संस्कृतीतील विद्रोहच आहे आणि कुठल्याही विद्रोहाशिवाय मानवी संस्कृतीला तिचा विकास साधता येत नाही. आजवर महाराष्ट्राच्या संस्कृतीने हा विद्रोह जोपासलेला दिसतो. महाराष्ट्रातील फुले, आगरकर, आंबेडकर, साने गुरुजी, विनोबाजी, कर्वे ही नावे ‘विद्रोही’ म्हणून घेता येतील. इथल्या स्त्री वर्गाचा आक्रोश, त्यातून जन्माला येणारा विद्रोह आणि पुरुषांचा परंपरेला प्रश्न करणारा विद्रोह हा अधिकाधिक ‘सम्यक’ होईल आणि त्यासाठी ‘पुरुष भान’ जागवत अधिकाधिक पुरुषांनी हा प्रवास सुरू करण्याची गरज आहे. स्त्रीवरील सत्ता, वास्तवाचे अज्ञान आणि स्वत:विषयीचे भ्रम हे पुरुषाला चिरकालीन आनंद ठेवा देऊ शकत नाहीत.
शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गाने जाणारा दु:खमुक्तीचा मार्ग बुद्धाने सांगितला आणि दु:खमुक्तीची आस मानवात असतेच, त्यातून वैयक्तिक पातळीवर हा मानवतेचा मार्ग अवलंबणारी माणसे आपल्याही आजूबाजूला सुटीसुटी लढताना दिसतात. एखादा या मर्दपणाच्या चौकटी तोडणारा आणि माणूसपणाची वाटचाल चालणारा पुरुष क्वचित दर्शन देऊन जातो. ‘इमरोज’च्या कवितेत तो म्हणतो –
‘संपूर्ण औरत जिस्म से कही बढकर होती है,
सोया जा सकता है औरत के जिस्म के साथ,
पर सिर्फ जिस्म के साथ
जागा नहीं जा सकता!’
कधी हे वैयक्तिक भान समूहभानात बदलत माणूसपणाकडे जाताना दिसतेही. त्यातून विभिन्नलिंगी संबंधांना स्वीकारण्याची चिन्हे दिसतात. तर कधी इथला समूह जातीय आणि धार्मिक अस्मिता बाजूला ठेवत विकासाच्या स्वप्नामागे जातोही, पुढे त्याचा भ्रमनिरास होऊ शकतो आणि होतोही. अशीच पावले पुढे-मागे पडत राहतात. हे प्रयत्न वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही असणे गरजेचे आहे. २७ वर्षांपूर्वी ‘पुरुष उवाच’ नावाच्या गटाने अशी एक सुरुवात केली होती. आज अनेक गट, संघटना या संदर्भात काम करताहेत. आज मर्दानगीचे भान व्यापक करण्यासाठी स्त्रिया आणि पुरुषांनी एकत्रपणे दीर्घकाळ असे ‘पुरुषभान’ जागवण्याची गरज आहे.
पुरुषभान परिषदेच्या आवाहनातील निवडक भाग
लिंगभाव समतेसाठी काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांच्या काही संघटनांनी एकत्र येऊन पुणे येथे ‘मर्दानगी’ या विषयावर चर्चा करण्यासाठी युवकांसाठी नुकतीच ‘पुरुषभान परिषद’ आयोजित केली होती. तसं पाहिलं तर आज ‘मर्दानगी’ (Masculinity) हा विषय अत्यंत कळीचा राजकीय प्रश्न बनलेला आहे. आजचा राजकीय अवकाश मर्दानगीच्या परिभाषेने आणि त्याच्या अभिव्यक्तीनेही अधिकाधिक व्यापत चाललेला दिसून येतो.
‘लव्ह जिहाद’सारखा बागुलबुवा उभा करणे असो की ‘ऑनर किलिंग’ हे सारे संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांच्या लैंगिकतेवर संपूर्ण वर्चस्व आणि नियंत्रण मिळविण्याचेच मार्ग आहेत. पुरुषी सत्तेला आव्हान देणाऱ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी खैरलांजी भगिनींवर आठ ग्रामपंचायत पदाधिकारी बलात्कार करून हत्या करतात हे जातीयवादी हिंसक पुरुषी मानसिकतेचे उदाहरण आहे. नगर जिल्ह्य़ातल्या राजेगावमधला सरपंच एका माणसाने हिशेब मागितला म्हणून त्याच्या बायकोवर बलात्कार करून फरार होतो. या साऱ्या अत्याचारी मानसिकतेचे जात-वर्गीय मर्दानगीशी आणि राजकीय सत्तासंबंधाशी जवळचे नाते आहे.
आपल्या जाणीव-नेणिवेत खोलवर रुजलेल्या मर्दानगी, अस्मिता, सत्तासंबंध व लैंगिकतेच्या चौकटी तसेच छॅइळच्या लैंगिक धारणांबाबत तुच्छता, या साऱ्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवा असे वाटते. काही पुरुषांनी स्त्रीवादी चळवळीच्या सहप्रवासात सहसंवेदना व्यक्त केलेली असली तरी स्वत:च्या जाणीव-नेणिवेतील पुरुषी सत्तेची अनेक मूल्ये मात्र काही पुरुष तशीच बाळगून असल्याने या पितृप्रधानतेच्या चौकटी मात्र अगदी अभेद्य राहिल्या आहेत. हा तुरुंग आपल्याला फोडायचा असेल तर पुरुषांनी आत्मशोध घेण्याची गरज आहे. त्यासाठी स्त्रिया आणि पुरुषांनी एकमेकांना मदत करण्याची गरज आहे.
स्त्री-पुरुष द्वैताच्या पलीकडे जाणारी पितृसत्तेविरुद्ध लढाई लढणे हे पुरुषांच्याही हिताचे आहे. ते दोघांनाही अंतिमत: माणूसपणाकडे नेणारे आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही मानवमुक्तीकडे नेणारी ही प्रक्रिया सुरू व्हायला हवी.
मुकुंद किर्दत -kirdatmukund@gmail.com
(लेखक ‘पुरुष उवाच’ या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.)