डॉ. वैशाली बिनीवाले

मुलींच्या जननसंस्थेची वाढ पूर्ण होऊन ती संपूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर दर २१ ते ३५ दिवसांमध्ये मासिक पाळी नियमित येऊ लागते. मात्र भारतात १० टक्के तरुण मुलींमध्ये ‘पीसीओएस’ ही समस्या कमी-जास्त प्रमाणात आढळते, तर काहींमध्ये मासिक पाळी येण्याआधी ‘पीएमएस’ची लक्षणंही जाणवतात. काय आहे त्यावर उपाय?

पौगंडावस्थेची पुढची स्थिती म्हणजे तारुण्य. मुलींच्या जीवनातील एक अत्यंत आनंददायी असा हा काळ. तारुण्य म्हणजे अमाप ऊर्जा व सळसळता उत्साह. तारुण्य म्हणजे कुतूहल आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुली स्वत:च्या आयुष्यात रममाण झालेल्या असतात. शिक्षण व करिअरमध्ये पूर्णपणे व्यग्र असतात. तारुण्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीचा काळ. या वयात जननसंस्थेची वाढ पूर्ण होते. जननसंस्था संपूर्णपणे कार्यरत होते. मासिक पाळी दर २१ ते ३५ दिवसांमध्ये नियमित येऊ लागते. काही वेळेस मात्र मासिक पाळीसंबंधित समस्यांसाठी या वयातील मुलींना डॉक्टरांकडे जावं लागतं.

अनियमितता ही मासिक पाळीची सगळ्यांत सर्वसामान्य समस्या आहे. नियमितपणे येणारी पाळी अचानक अनियमितपणे कधीही येऊ लागते. थायरॉईड, प्रोलॅक्टीनसारख्या संप्रेरकांमधील असंतुलन, मानसिक व शारीरिक ताणतणाव यासाठी कारणीभूत असतात आणि यातीलच एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरीयन सिंड्रोम’(पीसीओएस) गेली दोन वर्षं सायलीची पाळी अनियमित झाली आहे. कधी बरोबर महिन्याने येते, तर कधी कधी तीन-चार महिनेसुद्धा येत नाही. आतासुद्धा गेले तीन महिने मासिक पाळी न आल्याने २४ वर्षांची सायली वैद्याकीय सल्ला घ्यायला आली होती. सायलीला इतरही अनेक त्रास होत आहेत. तिचं वजन वाढलंय, हनुवटीवर जाड लव येते आहे. चेहऱ्याची त्वचाही मुरुम-पुटकुळ्यांनी खराब झाली आहे. सायलीच्या लक्षणांवरून तिला ‘पीसीओएस’चं प्राथमिक निदान झालं. ‘पीसीओएस’ ही हल्ली अनेक मुलींमध्ये आढळणारी समस्या आहे. भारतात १० टक्के तरुण मुलींमध्ये ही समस्या कमी-जास्त प्रमाणात आढळते. यामध्ये बीजनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये (Ovulation) दोष निर्माण होतो. यामुळे होणारे संप्रेरकांतील असंतुलन मुलींमध्ये दिसणाऱ्या लक्षणांना कारणीभूत असतं.

‘पीसीओएस’चा त्रास असणाऱ्या स्त्रियांमध्ये ‘अॅन्ड्रोजेन’ या पुरुषांमध्ये आढळणाऱ्या संप्रेरकाचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरावर विशेषत: हनुवटीवर जाड लव येते. चेहऱ्यावर मुरुम-पुटकुळ्या येतात. मानेची त्वचा काळी पडते. केसगळती वाढल्याने टक्कल पडू शकतं. ‘पीसीओएस’मध्ये इन्सुलिन संप्रेरकाला प्रतिरोध निर्माण होतो. यामुळे वजन वाढतं. ‘पीसीओएस’चा आजार असलेल्या ८० टक्के मुलींमध्ये लठ्ठपणा आढळतो. इन्सुलीनला प्रतिरोध झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. बीजनिर्मितीत दोष निर्माण झाल्यामुळे या मुलींमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळते. प्रौढावस्थेत या स्त्रियांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो. लठ्ठपणा, त्वचेच्या समस्या व संप्रेरकांमधील असंतुलनामुळे या मुलींच्यात नैराश्य, मानसिक असंतुलन यांसारख्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात. ‘पीसीओएस’चं निदान करण्यासाठी रक्तातील संप्रेरकांची पातळी तपासण्यात येते. सोनोग्राफीमध्ये बीजांडकोशावर पाण्याने भरलेल्या छोट्या गाठी ‘पीसीओएस’मध्ये दिसतात. निदान झाल्यावर या मुलींना सर्वप्रथम जीवनशैली सुधारण्याचा सल्ला दिला जातो. नियमितपणे दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्याने संप्रेरकातील असंतुलन कमी होते. संतुलित आहार घेणं, आहारातील कर्बोदकं, दुग्धजन्य पदार्थ व मांसाहार कमी केल्यास ‘पीसीओएस’ची तीव्रता कमी होते. वजन आटोक्यात येतं. जागरणं न करता पुरेशी झोप घेणं, ताणतणाव कमी करणं याचाही सकारात्मक फायदा होतो. ‘पीसीओएस’ची समस्या कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. संप्रेरकांमुळे मासिक पाळी नियमित करता येते तसेच त्वचेच्या समस्या कमी होतात. इन्सुलीन प्रतिरोध औषधांच्या साहाय्यानं हा त्रास कमी करता येऊ शकतो. वंध्यत्वाची समस्या असल्यास बीजनिर्मिती नियमित होण्यासाठी औषधं दिली जातात. चेहऱ्यावरील अनावश्यक लव लेझरच्या साहाय्याने नियंत्रणात आणता येते.

‘‘डॉक्टर, दोन महिन्यांपूर्वी घरी पूजा असल्यामुळे मी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या. मला गोळ्यांचं नाव नाही माहिती, पण कोपऱ्यावरच्या औषधांच्या दुकानातून त्या घेतल्या होत्या. माझी आईसुद्धा पाळी लांबवायला अशा गोळ्या अधूनमधून घेते. पण आता गोळ्या घेतल्यापासून माझी मासिक पाळी अनियमित झाली आहे. कधीही थोडा थोडा रक्तस्राव होतो. आता काय करू?’’ २१ वर्षांची केतकी सांगत होती. तिच्याप्रमाणे अनेक मुली, स्त्रिया मासिक पाळी लांबवण्यासाठी वैद्याकीय सल्ल्याशिवाय औषधं घेत असतात. हे किती योग्य आहे? खरं तर नियमित मासिक पाळी पुढे-मागे करण्यासाठी शक्यतो औषधं घेऊ नयेत. ही औषधं संप्रेरकयुक्त असल्याने त्यांचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. अगदी एखाद्या वेळी नाइलाजाने अशी औषधं घ्यावी लागलीच तर ती वैद्याकीय सल्ल्यानेच घ्यावीत. निधीला मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीचा त्रास होतो. ही पोटदुखी तिला अजिबात सहन होत नाही. पण औषधांची सवय होईल म्हणून तिची आई तिला वेदनाशामक औषधं घेऊ देत नाही. रुचिरालासुद्धा मासिक पाळीच्या वेळी पोटात व कंबरेत खूप दुखतं. कधी कधी वेदनाशामक औषधांचाही फारसा उपयोग होत नाही. दोन-तीन दिवस काम सोडून घरी बसावं लागतं. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणं नॉर्मल आहे का? वेदनाशामक गोळ्या कायमस्वरूपी घेणं योग्य आहे का? तर, मासिक पाळीच्या वेळी थोडं पोटात दुखणं, कंबर-पाय दुखणं हे अगदी सामान्य आहे. पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या आकुंचन पावण्यामुळे व तिथला रक्तपुरवठा वाढल्यामुळे हे दुखतं. हे दुखणं पोट-कंबर शेकण्यानं, थोडा व्यायाम केल्यानं कमी होतं. वैद्याकीय सल्ल्याने वेदनाशामक गोळ्या घ्यायलाही हरकत नाही. दुखण्याची तीव्रता जास्त असेल तर मात्र डॉक्टरांकडे जायलाच हवं. बीजांडकोश व गर्भाशयाच्या गाठी, जननसंस्थेचा जंतुसंसर्ग यांसारखी त्याची कारणं असतात. ‘एन्डोमेट्रीओसिस’ (Endometriosis) या आजारात पोटात दुखण्याची तीव्रता जास्त असते. या आजारात गर्भाशयाचं आतलं आवरण ‘एन्डोमेट्रियम’ (Endometrium) गर्भाशयाबाहेर वाढत असतं. दर महिन्याला मासिक पाळीच्या वेळी या गर्भाशयाबाहेरील आवरणात रक्तस्राव होतो व तिथे गाठी तयार होतात. यामुळे पोटात दुखतं. ही पोटदुखीची वेदना मासिक पाळीच्या वेळी सुरू होऊन पाळीनंतरही काही दिवस चालू राहते. ‘एन्डोमेट्रिओसिस’चं निदान झाल्यास ओषधोपचाराने ही वेदना कमी करता येते.

प्रत्येकीला मासिक पाळीच्या दरम्यान साधारणत: ३० ते ८० मिलि. रक्तस्राव होतो. रक्तस्रावाचं प्रमाण जास्त असल्यास डॉक्टरांकडे जायला हवं. रक्तस्राव जास्त होतो हे कसं समजायचं? दिवसाला चार-पाचपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला लागत असतील किंवा रक्तस्रावाबरोबर रक्ताच्या मोठ्या गाठी जात असतील तर त्याचा अर्थ जास्त रक्तस्राव होतो आहे. जास्त रक्तस्राव झाल्यास किंवा सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रक्तस्राव चालू राहिल्यास वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा. संप्रेरकांमधील असंतुलन व गर्भाशयाच्या गाठींमुळे जास्त रक्तस्राव होऊ शकतो. जास्त रक्तस्रावामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होऊन दम लागणं, अशक्तपणा येणं, गरगरणं यासारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच जास्त रक्तस्राव होत असल्यास औषधोपचार हवेत.

भारतातील ५७ टक्के स्त्रियांमध्ये म्हणजेच रक्तक्षयाची (अॅनिमिया) समस्या आढळते. (याच पुरवणीच्या पान १ वर याविषयी अधिक माहिती आहे) यात रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असते. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. अन्नामध्ये लोहाचे प्रमाण कमी असणं, कुपोषण, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणं, जंतसंसर्ग ही त्याची महत्त्वाची कारणं. रक्तक्षयामध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. गंभीर प्रकारच्या रक्तक्षयात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सात ग्रॅमपेक्षा कमी होते. अशा वेळी हृदयावर ताण येऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे जीवघेणा प्रसंग ओढवू शकतो. रक्तक्षय असलेल्या स्त्रियांना पुढे गरोदरपणही झेपत नाही. यामुळे रक्तक्षय असल्यास अन्नातील लोहाचं प्रमाण वाढवायला हवं. हिमोग्लोबिनचं प्रमाण अतिशय कमी असल्यास लोहाची इंजेक्शने देण्याची अथवा रक्तसंक्रमण (Blood transfusion) करण्याची गरज भासू शकते.

‘‘डॉक्टर, गेले काही महिने मासिक पाळीच्या आधी काही दिवस मला खूप त्रास होतोय.’’ अर्चना सांगत होती. ‘‘खूप चिडचिड होते. सारखं रडायला येतं. अंगावर इतकी सूज येते की कपडे आणि चपलासुद्धा घट्ट होतात. खूप आजारी असल्यासारखं वाटतं. छातीत दुखतं. एकदा मासिक पाळी सुरू झाली की अगदी पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं. सगळे त्रास कमी होतात. याला काही उपाय आहे का? कारण महिन्यातले जवळजवळ आठ दिवस माझे या त्रासातच जातात.’’

अर्चनाला होणारी ही लक्षणे म्हणजे ‘पीएमएस’(pre menstrual Syndrome). जवळजवळ ५० टक्के स्त्रियांना याची लक्षणं थोड्याफार प्रमाणात जाणवतात. शरीरातील संप्रेरकांमधील बदल व सिरोटोनिन या पदार्थाची पातळी कमी होणं ही त्याची काही कारणं. ही लक्षणं मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी काही दिवस जाणवू लागतात व मासिक पाळी आल्यानंतर कमी होतात. अंगावर सूज येणं, दमायला होणं, स्तनांमध्ये जडपणा येऊन दुखणं, डोकं दुखणं ही त्याची सर्वसामान्य लक्षणं आहेत. यामध्ये चिडचिडेपणा, मानसिक असंतुलन, नैराश्य, मन एकाग्र न होणं, पुरेशी झोप न लागणं यासारखे मानसिक त्रासही जाणवतात. पीएमएसचा त्रास होत असलेल्या स्त्रियांनी जास्त प्रमाणात चहा-कॉफी पिणं, धूम्रपान करणं, मसालेदार पदाथं खाणं टाळावं. नियमित व्यायाम, पुरेशी झोप व संतुलित आहाराने ‘पीएमएस’चा त्रास कमी होतो. याशिवाय कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘ड’, वेदनाशामक औषधं, यांचा उपयोग होतो. खूप त्रास झाल्यास संप्रेरके व मानसिक आजारावरील औषधं दिली जातात.

मासिक पाळीच्या तक्रारी या एखाद्या शारीरिक व्याधीचं लक्षण असू शकतात. त्यावर वेळेत उपचार न झाल्यास पुढील आयुष्यात गंभीर समस्या बनू शकतात. म्हणूनच मासिक पाळीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वैद्याकीय सल्ला घ्यायलाच हवा. तारुण्याचा काळ हा आनंदाचा, सळसळत्या उत्साहाचा असतो तो कायमस्वरूपी टिकवायला हवा असेल तर आरोग्यभान हे हवंच.

vaishalibiniwale@yahoo.com