डॉ. अवंतिका वझे (परब)

मुलीची मासिक पाळी सुरू झाली, की ‘चला, हिच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला,’ असे म्हणत पालकांचा जीव भांड्यात पडतो. परंतु एखादीला गर्भाशयच नसणे, अंडाशयाची क्षमता अत्यंत कमी असणे किंवा असंतुलित संप्रेरके, अशा कोणत्याही कारणांनी मासिक पाळी न येणे किंवा उशिरा येणे, यांसारख्या समस्या असू शकतात. आपल्याकडे मुलीच्या पाळीचा संबंध अधिक करून लग्न, मुले याच्याशीच जोडला जातो. ‘तिच्या पाळीच्या समस्येमुळे तिच्या आयुष्यावर, शारीरिक, बौद्धिक क्षमतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो का?’ असे विचारणारे पालक फारच कमी असतात. येत्या २८ मे रोजीच्या ‘मासिक पाळी स्वच्छता दिना’च्या निमित्ताने…

पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक. आल्यावर नकोशी वाटणारी आणि नाही आली तरी काळजी करायला लावणारी पाळी स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी अगदी जवळीक साधणारी आहे. महिन्याचे ‘ते’ चार दिवस जरी अगदी नकोसे असले, तरी पाळी सुरुच न होणे किंवा अनियमित असणे जास्त क्लेशकारक ठरते.

पूर्वीच्या काळी पाळी आली की स्त्री गर्भधारणा होण्यास सक्षम आहे असे समजून लगेच तिचे लग्न लावून दिले जायचे. अजूनही अनेक समाजांत- विशेषत: ग्रामीण भारतात बालविवाहाची प्रथा आहे. मुलीचे लग्न अगदी लहान वयात लावले जाते आणि पाळी व्यवस्थित येईपर्यंत ती आईवडिलांकडे राहून नंतर सासरी जाते. एकूण काय, तर मुलीच्या जन्माचा वा लग्नाचाही एकमेव उद्देश प्रजनन हाच समजला जातो! अर्थात निदान शहरी भागात तरी ही मानसिकता कमी होत आहे.

आणखी वाचा-सांधा बदलताना: भान हरवलेल्यांचं भान!

पाळीभोवती शारीरिक आणि मानसिकच नव्हे, तर दुर्दैवाने सामाजिक आरोग्यदेखील जोडलेले आहे. पूर्वी आपल्याकडे मुलीला पाळी यायला लागली, की घरात गोड करून पाळी साजरी केली जायची. म्हणजे एकदा का पाळी यायला लागली, की ती स्त्री म्हणून ‘परिपूर्ण’ आहे असे समजले जायचे! परंतु पाळी न येणारी मुलगीसुद्धा सामान्य आयुष्य जगू शकते, हे अजूनही मुलीच्या पालकांनाच पटत नाही, तर इतरांचा विचारच नको. परवाच आमच्या स्वयंपाकाच्या मावशी सांगत होत्या, की ‘नुकतेच दोन महिन्यांपूर्वी मुलाचे लग्न झाले आहे. पण सुनेला पाळी व्यवस्थित येतच नाही. लग्नाआधी तिने ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली.’ त्यांच्या बोलण्यात थोडी चीड, फसवणूक झाल्याची भावना होती. खरेतर पाळी ही वैयक्तिक गोष्ट आहे. कदाचित अनियमित पाळी ही सासरच्यांना मुद्दाम सांगावी अशी गोष्ट आहे असे सुनेला वाटले नसेल. अथवा तेवढी मोकळीक तिला अजून वाटत नसेल… कदाचित तिच्या या बाबतीत काही वैद्याकीय तपासण्या झाल्याही असतील, मात्र तिला ती माहिती स्वत:शी मर्यादित ठेवायची असेल. अर्थातच मावशींच्या सुनेला न बघता, तिच्याशी न बोलता परस्पर तिच्या सासूला अर्धवट माहिती देणे नैतिकदृष्ट्या माझ्या तत्त्वात बसत नव्हते. त्यामुळे ‘सुनेला घेऊन ये,’ एवढे बोलून मी विषय थांबवला! मात्र लग्नानंतर दोनच महिन्यात सुनेला पाळी व्यवस्थित येत नाहीये या विचाराने सासूचे मन खट्टू झालेय, हे मला थोडे खटकलेच.

मी जेव्हा वयात आले, तेव्हा आम्हा मैत्रिणींमध्ये पाळीबद्दल कुजबुज व्हायची. कुजबुज याकरता, की आम्हीही तेव्हा या विषयावर मोकळेपणाने बोलत नसू. परंतु तेव्हा एक मैत्रीण म्हणाल्याचे आठवतेय- ‘अगं, पाळी नाही आली तर आपण ‘तसे’ होतो!’. ते अडनिड्या वयातले, माहितीचा पूर्ण अभाव असलेले वाक्य माझ्या मनात ठाण मांडून बसले होते. आता समजा, आमच्यापैकी कोणाला वेळेत पाळी आली नसती, तर या समजाचा त्या मुलीच्या मनावर किती भयंकर परिणाम झाला असता! पौगंडावस्थेतील नाजूक वळणावर अशा अशास्त्रीय, असंवेदनशील विधानांमुळे केवढा आघात झाला असता…

पाळी योग्य वयात सुरू न होण्याची अनेक कारणे आहेत. अचानक वजन वाढणे, असंतुलित संप्रेरके, संप्रेरकांची कमतरता, ताणतणाव ही त्यातील काही महत्त्वाची कारणे. या विषयावर पालकांशी चर्चा करून वैद्याकीय उपाय करणे सहज शक्य असते. त्याचबरोबर त्याच्याशी निगडित असलेल्या, आरोग्यावर होणाऱ्या इतर दुष्परिणामांचीही माहिती मुलीला आणि पालकांनाही देणे गरजेचे असते. उदाहरणार्थ- असंतुलित संप्रेरके (पीसीओएस- पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम) असलेल्या स्त्रियांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. तीन-चार महिन्यांतून एकदा पाळी येणाऱ्या स्त्रियांमध्ये अवाजवी रक्तस्राव होणे, रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी खालावणे, अशा समस्या निर्माण होतात. तसेच त्यांना पुढे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता इतर स्त्रियांपेक्षा अधिक असते. त्यामुळे औषधांच्या सहाय्याने वेळच्या वेळी पाळी आणणे या इतर परिणामांना प्रतिरोधात्मक ठरू शकते.

आणखी वाचा-स्त्री विश्व : स्त्रीचं ‘बार्बी’ शरीर

काही स्त्रियांमध्ये दिसते ते Premature Ovarian Failure. म्हणजे अंडाशयाची क्षमता अत्यंत कमी असल्याने संप्रेरके कमी तयार होतात आणि त्यामुळे पाळी येत नाही. परंतु योग्य निदान झाल्यास औषधांच्या सहाय्याने नियमित पाळी आणता येते. या स्त्रियांमध्ये संप्रेरकांच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम (हाडे ठिसूळ होणे, रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे.) हेदेखील औषधोपचारांमुळे टाळता येतात. एवढेच नव्हे, तर कृत्रिम गर्भधारणा पद्धतीने (IVF) त्यांना गर्भधारणादेखील होऊ शकते.

काही स्त्रियांमध्ये गुणसूत्रीय बदल दिसून येतात. अशांमध्ये पाळी न येण्याबरोबरच इतर काही जटिल आजार असू शकतात. उदाहरणार्थ- ‘टर्नर सिंड्रोम’ या जनुकीय आजारात पाळी न येण्याबरोबरच हृदयाचे काही आजार दिसून येतात. त्याचे निदान झाल्यास आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जाऊ शकते.

मानसिक स्वास्थ्याचादेखील पाळीशी जवळचा संबंध आहे. नैराश्यासारख्या (depression) काही मानसिक व्याधींमध्ये पाळी अनियमित येते. तसेच या व्याधीवर दिलेल्या औषधांचाही पाळीवर परिणाम होतो. मात्र त्या आजारातून मुक्त झाल्यावर आणि औषधे थांबल्यावर पाळी पुन्हा नियमित होते. अत्यंत ताणतणाव, नोकरीतल्या समस्या, नातेसंबंधातले तणाव, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एवढेच नव्हे, तर कधी कधी महत्त्वाच्या वा स्पर्धा परीक्षांच्या वेळीही पाळी चुकण्याची समस्या बऱ्याचदा दिसून येते. म्हणूनच तणावमुक्तीसाठी योग, ध्यानधारणा हे मानसिकच नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाचे आहे.

पाळी न येणाऱ्या बऱ्याच मुली आई-वडिलांबरोबर तपासायला आलेल्या असतात. त्यांच्या आई-वडिलांची अशी इच्छा असते, की एकदा हिची पाळी चालू झाली की लग्न लावून देता येईल! दुर्दैवाने अनेक आई-वडील फक्त लग्न, मुले याचीच चिंता करत असतात. ‘डॉक्टर, तिच्या इतर आयुष्यावर, शारीरिक, बौद्धिक क्षमतेवर याचा काही दूरगामी परिणाम होणार नाही ना?’ असे विचारणारे फारच कमी असतात. तर बऱ्याच स्त्रिया ही गोष्ट त्यांच्या नवऱ्यापासून, सासरच्या लोकांपासून लपवून ठेवतात. वंध्यत्वावर उपचार करायची, खर्च करायची त्यांची तयारी असते; विनंती एकच- पाळीची समस्या कोणाला सांगू नका! म्हणजे पाळी न येण्याबाबत इतके सामाजिक पाश आहेत, की आपल्याला तिथे स्वीकारले जाणार नाही, या भीतीने त्यांचा हा लपंडाव सुरू असतो.

आणखी वाचा-इतिश्री : मुलं असं ‘कशामुळे’ वागतात?

मी सरकारी रुग्णालयात शिकत असताना एक मुलगी तपासायला आली होती, तिचे गर्भाशय अणि योनीमार्ग मुळातच विकसित झाला नव्हता. (mullerian agenesis) तिचे अंडाशय व्यवस्थित होते, संप्रेरके योग्य प्रमाणात होती. मात्र गर्भाशय नसल्याने पाळी कधीच येणे शक्य नव्हते. अशा स्त्रियांना पतीबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी योनीमार्ग विकसित करण्याची शस्त्रक्रिया (vaginoplasty) करावी लागते. या मुलीला आई-वडील नव्हते आणि एका जवळच्या नातेवाईकांबरोबर ती आली होती. त्या नातेवाईक बाई एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. विशेष गोष्ट अशी, की सर्व परिस्थिती समजून घेऊन त्या दोघी या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन समुपदेशन आणि शस्त्रक्रिया करण्यास आल्या होत्या. अनाथ असूनही या मुलीने, तिच्या नातेवाईकांनी आणि नवऱ्यानेही कुठलाही आडपडदा न ठेवता गोष्टी जाणून घेतल्या आणि योग्य वेळी निर्णय घेतला, याचे मला कौतुक वाटले.

असेच दुसरे एक उदाहरण- गर्भाशय विकसित नसलेल्या एका स्त्रीचे वैवाहिक आयुष्य व्यवस्थित चालू होते. ‘व्हजायनोप्लास्टी’ शस्त्रक्रिया झाल्यामुळे शरीरसंबंधांत अडचण नव्हती. मात्र गर्भाशय नसल्याने मूल होणे शक्य नव्हते. पती-पत्नी दोघेही अत्यंत समंजस होते, मात्र सासरच्या मंडळींना याबाबत अजिबात माहिती नव्हती. या स्त्रीचे अंडाशय विकसित होते, त्यामुळे तिची स्त्रीबीजे आणि नवऱ्याचे शुक्राणू यांपासून कृत्रिम गर्भधारणा पद्धतीने (आयव्हीएफ) भ्रूण तयार करून त्याचे ‘सरोगेट’ मातेच्या गर्भाशयात रोपण करण्यात आले. यामार्गे त्यांना अपत्यप्राप्ती झाली. हे त्या जोडप्याने सासरच्यांना माहिती होऊ न देता गुप्तपणे, पण कायदेशीर मार्गाने घडवून आणले आणि त्यांची बऱ्याच काळापासूनची इच्छा पूर्ण झाली. (काही वर्षांनी त्या दोघांनी सरोगसीद्वारा दुसऱ्या अपत्यासाठीही विचारणा केली होती. परंतु तेव्हा सरोगसी कायदा आला होता आणि या कायद्यानुसार एक निरोगी अपत्य असताना दुसरी अपत्यप्राप्ती सरोगसीद्वारा करण्यास मान्यता नाही. त्यामुळे त्यांची दुसऱ्या बाळाची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही.)

आणखी वाचा-एका मनात होती : तिथे दूर देशी…

अशी ही पाळी! बरीचशी वैयक्तिक, थोडी कौटुंबिक आणि थोडीशी सामाजिक! पाळी स्त्रीवरच्या कौटुंबिक आणि सामाजिक दबावाचा विषय होऊ नये हे खरे, परंतु त्याच वेळी मासिक पाळीच्या समस्या मोकळेपणाने स्वीकारणेही गरजेचे आहे. समस्या स्वीकारली, तरच तिच्यावर उपाययोजना करणे शक्य आहे. ती लपवून ठेवली तर तिच्यातून मार्ग तर निघणार नाहीच, पण आजूबाजूचा दबाव आणि त्याबरोबरीने मानसिक ताण वाढेल. जोपर्यंत पाळीविषयीचे गैरसमज दूर होत नाहीत, तोपर्यंत ती कुजबुजच ठरेल. ही कुजबुज थांबवून योग्य तिथे खुलेपणाने बोलता यावे, यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील.

vazeavantika@yahoo.com