नीलिमा किराणे
‘पालकत्व’ ही अनेकांना आजच्या काळात खूप आव्हानात्मक वाटणारी गोष्ट. त्यात मूल नुकतंच पौगंडावस्थेत अर्थात ‘टीनएज’मध्ये प्रवेश केलेलं असेल, तर त्याच्या बोलण्या- वागण्यात पडणारा फरक इतका वेगात घडतो, की पालक गोंधळून जातात. त्या वेळी हा असा ‘कसं’ वागू शकतो? ऐवजी ‘कशामुळे’ असा वागतो? या प्रश्नांचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला, की मुलांच्या अनाकलनीय वागण्याचे अर्थ लागू शकतात.

ऑफिसमधून कंटाळून आलेल्या ऐश्वर्यानं दारात पाय ठेवला, तेव्हा घरभर पसाराच पसारा होता. दारात बूट-मोजे अस्ताव्यस्त, पलंगावर बोर्डगेमची कार्ड्स, कपडे, टेबलवर ज्यूसचे ग्लास तसेच. आपल्याच वयाचा ‘टीनएज’ मित्र रोहितबरोबर हर्ष व्हिडीओ गेममध्ये गर्क होता. इतक्यांदा सांगूनदेखील आजही रोजचंच दृश्य पाहून ऐश्वर्याचा फ्यूज उडाला.
मुलांचं काहीही न ऐकता तिनं ‘आधी खोली साफ करा’ म्हणून सांगितलं. कसंबसं, देणं दिल्यासारखं आवरताना हर्ष काही तरी पुटपुटला आणि त्यावर रोहित फिस्कन हसला. ऐश्वर्याला तो अपमान वाटला. ती दोघांनाही रागावल्यावर रोहित घरी जाण्यासाठी सॅक उचलायला लागला. त्यामुळे भडकून हर्ष उद्धटपणे काही तरी बोलला. मग मायलेकांचं युद्धच पेटलं. ऐश्वर्यानं त्याच्या चुकांचा पाढा वाचला. त्यानंही ‘‘कायम तुझंच का ऐकायचं? तू माझ्या आवडीचे पदार्थसुद्धा करत नाहीस,’’ वगैरे काढलं. वादाला फाटे फुटत गेले. ‘‘असा वागणार असशील तर तुझ्या वाढदिवसाला नवीन ड्रेस आणणार नाही,’’ पर्यंत ऐश्वर्या पोहोचली. त्यावर, ‘‘मग मी पण तुझा नवा ड्रेस कापून टाकीन.’’ या हर्षच्या उलट उत्तरावर भडकून ऐश्वर्यानं एक झापड ठेवून दिली. मात्र हर्ष रडला नाही. आव्हान दिल्यासारखा छाती पुढे काढून मख्खपणे उभा राहिला.
हतबल झालेल्या ऐश्वर्यालाच आता संतापानं रडायला येत होतं. परवा-परवापर्यंत गोंडसपणे आपल्या मागे मागे करणारा लाडका हर्ष हल्ली खुन्नस का देतो? आज आपलाही हात उचलला गेला. वागायचं तरी कसं याच्याशी? वयात येणाऱ्या मुलांचं वागणं असंच असतं का? ती वैतागलीच.
अखेरीस तिनं तिच्या चुलतबहिणीला, निकिताला फोन लावला. निकिता पालक-मुलांसाठी शिबिरं, कार्यशाळा घ्यायची. एका कार्यशाळेत ऐश्वर्याही सहभागी झाली होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवलं.

Shocking twist in child abduction case of Chikhli cousin murder 10 years old boy
भयंकर! आधी गळा दाबला, मग पोत्यात कोंबले आणि उकीरड्यात पुरले! आते भावानेच…
doctor successfully performed complicated surgery and gave a new life to elderly person
ज्येष्ठ नागरिकाच्या जगण्याची केवळ दोन टक्के शक्यता असूनही असे वाचले प्राण…
Committee, Flamingo, Habitat,
फ्लेमिंगो अधिवास, कांदळवन संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश
dead
बुलढाणा: वाढदिवसाला हातात जहाल विषारी साप दिला; ‘थरारक’ प्रयोग जीवावर बेतला…
mumbai businessmen, cheated for rupees 1 crore
मुंबई: स्वस्त सोन्याची बिस्किटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
hardik & krunal pandya
‘हार्दिकला वाट्टेल ते बोललं गेलं, त्याच्या मनाचा कोणीच विचार केला नाही’; कृणाल पंड्याची भावासाठी भावुक पोस्ट
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
how to save in water
वाहत्या पाण्यात समूहाने अडकलात तर स्वतःसह इतरांचा जीव कसा वाचवाल? भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर प्रशिक्षण देणारा VIDEO व्हायरल!

आणखी वाचा-सांदीत सापडलेले : मैत्री

निकिताला कालचा प्रसंग सांगून ऐश्वर्या म्हणाली, ‘‘हल्ली हर्षशी वागायचं कसं तेच कळेनासं झालंय निकी. इतका गोड मुलगा अचानक उद्धटपणे खुन्नस का देतोय? अभ्यासाचा आळस, शिस्त नाही, त्यात आता तर सुट्टीच. त्याच्या बाबाशी बरा वागतो, पण आईशी वैर का? काय करू मी?’’ ऐश्वर्याचे प्रश्न आणि आवेग शांत झाल्यावर निकिता म्हणाली, ‘‘एवढी कासावीस नको होऊ. शिंगं फुटण्याच्या या वयात बऱ्याच मुलांचं असं होतं. आई वळण लावते याचाही राग असतो.’’
‘‘हे तू ‘टीनएजर्स’च्या पालकांच्या कार्यशाळेत सांगितलं होतंस. पूर्णपणे तसं वागायला मला जमत नसलं, तरी मुलांची मानसिकता आता थोडीफार कळते. हल्ली हर्षच्या वागण्यातून, ‘तू मला काही सांगायचं नाहीस… मग मी तुला त्रास देणार,’ हे सतत दिसतं ना, त्यामुळे काळजी वाटते.’’ ऐश्वर्यानं सांगितलं.
‘‘असं म्हणतेस? मग हर्ष असा कसं काय वागू शकतो? ऐवजी ‘कशामुळे’ वागतो? असं पाहू या. मला सांग, अन्न, वस्त्र, निवारा, या गरजांनंतरची आपली गरज काय असते? तर स्वत:ची ओळख. तशीच आपल्या जगात महत्त्वाचं असणं ही मुलांचीसुद्धा भावनिक गरज असते. काही मुलांना आपोआप समज येते, की चांगुलपणामुळे, इतरांना मदत केल्यामुळे जगाकडून ओळख, कौतुक मिळतं. तशा सकारात्मक पद्धतीनं ती वागत जातात. काही मुलांना मात्र त्यांच्या स्वभावामुळे, घरातल्या, बाहेरच्या वातावरणामुळे किंवा कशाहीमुळे असेल, इतरांकडून ‘मनासारखं’ महत्त्व मिळत नाही. ओळख मिळवायचा रस्ता हुकतो. तेव्हा ‘स्वत:ची ओळख’ याबद्दल ते एखादा समज करून घेतात.’’
‘‘म्हणजे?’’ ऐश्वर्याला उमगलं नाही.

आणखी वाचा-जिंकावे नि जगावेही : नातं… माझं, माझ्याशी!

‘‘काही मुलांचा समज ‘मी बॉस आहे, माझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे. मला काही सांगायचं नाही,’ असा काही तरी होतो. शाळेत ‘दादागिरी’तून मुलांना मिळणारा मोठेपणा पाहूनही ‘मी जिंकलो तरच मोठा,’ हे पक्कं ठसतं. घरातल्या एखाद्या आरडाओरडा करणाऱ्या व्यक्तीचा दबदबा असेल, सगळे भिऊन त्यांचं ऐकत असतील, मान देत असतील, ते पाहूनही मुलांची ती महत्त्व-‘सिग्निफिकन्स’ची व्याख्या बनते.’’
‘‘पण घरातही सतत अरे ला का रे?’’
‘‘हर्ष प्रत्येक वेळी असं वागत नसणार. तुम्ही अधिकारवाणीनं काही सांगायला गेलात की ‘बॉस मी आहे, मला नाही सांगायचं,’ हे वर येत असणार.’’
‘‘असू शकेल. कालही रागाच्या भरात मी वरच्या पट्टीत अधिकारवाणीनं बोललेच.’’
‘‘मुलांच्या मनातला ‘पॉवरगेम’- ‘मी जिंकणारच’ हे जागं झाल्यावर, विरोध, भांडण ही गरज बनते. कारण युद्ध झाल्याशिवाय ते जिंकणार कसे? भांडण करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा केली, की ते पुन्हा पुन्हा जिंकणार, सिद्ध होणार. तर मुलं काय करतात, वाद सुरू झाल्यावर तुमच्या नकळत तुमच्या हातात एक तलवार सारतात, जी तुम्ही घेणारच, हे त्यांना माहीत असतं. कालच्या भांडणात, ‘तू माझ्या आवडीचे पदार्थ करतच नाहीस… मी तुझा ड्रेस कापून टाकीन…’चा घाव तुझ्या वर्मी लागला. अशी दुखावणारी, चीड आणणारी वाक्यं म्हणजे हर्षनं तुझ्या हातात सारलेली तलवार होती. ती घेऊन तू जोरजोरानं वार करून त्याला लढायला, म्हणजेच ‘जिंकायला’ संधी देत गेलीस, हे तुला कळलंच नाही. तू तलवार घेतल्यावर तो तयारीत होता. तू बेसावध… त्याच्या अनपेक्षित वारांनी घायाळ, हतबल झालीस आणि हर्ष जिंकला. आता पुढच्याही वेळी तो हेच तंत्र वापरून त्याच्या समजाप्रमाणे महत्त्व मिळवणार.’’

‘‘खरंय गं… मी भडकणारच अशा कुरापती तो काढतो. मी खवळते आणि महाभारत सुरू होतं. पण अशा वागण्यानं चीड येणारच ना?’’
‘‘तू चिडल्यावरच पुढचं महाभारत घडतंय ना? तरी तो ऐकत नाहीच ना. उलट दर भांडणानंतर तुलाच असहाय, हरल्यासारखं वाटतंय.’’
‘‘पण मग मी करायचं काय?’’ ऐश्वर्या आणखीनच हरली.
‘‘त्यासाठी तुला हर्षची जिंकण्याची गरज समजून घेतली पाहिजे. तो तुला त्रास देण्यासाठी असा वागत नाही. ‘सिग्निफिकन्स’ मिळवण्याच्या नैसर्गिक गरजेतून ते घडतंय. त्यामुळे तो तलवार हातात देणार आहे, हे लक्षात ठेवून तू सावध राहायचंस. अजिबात तलवार घ्यायची नाही. हर्ष आता मोठा दिसायला लागला असला तरी अजून लहानच आहे ऐशू! जसं इमारतीचं बांधकाम झालंय, पण मेंदूचं वायरिंग चालू आहे. त्यामुळे, या संवेदनशील टप्प्यावर, स्वत:ची ओळख सकारात्मकतेनं कशी निर्माण करता येते याचा अनुभव द्यायला हवा.’’
‘‘म्हणजे काय करायचं?’’
‘‘आज्ञा सोडणं, चुका काढणं हे मुलांचे ‘ट्रिगर’ असतात. ते थांबवायचे. ‘मला तुझ्याशी वाद घालण्यात रसच नाही,’ असं स्पष्ट सांगायचं. तू त्याला वादात हरवू शकत नाहीस हे मान्य केलं तरी चालेल. तू तलवार म्यान केल्यानंतर, ‘आता कसं जिंकणार?’ यानं तो भांबावतो. लढण्याशिवायचा दुसरा पर्याय सुचवण्याची हीच योग्य वेळ. म्हणजे, ‘मला थोडी मदत हवीय, करशील?’ म्हणून छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या. त्यावर त्यांचं कौतुक करावं. या वयाच्या मुलांना जबाबदारी घ्यायला आवडतं. त्यातून मोठेपणा, कौतुक, ओळख, विश्वास मिळाल्यावर, ‘पॉवरगेम’ची गरज कमी होते.’’

आणखी वाचा-‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!

‘‘थोडक्यात, त्याला लहान समजायचं नाही आणि जबाबदारी पार पाडल्याचं कौतुक करायचं… मग पुढची जबाबदारी द्यायची.’’ तिचं म्हणणं ऐश्वर्याला समजू लागलं होतं.
‘‘करेक्ट! दुसरं म्हणजे, काल तू हर्षवर हात उचललास, तोही रोहितसमोर! त्याबद्दल ‘अनकंडिशनल सॉरी’ नक्की म्हणायला हवं. आपण मोठे आहोत म्हणून हात उचलणं हे न्याय्य नाहीच. त्याला दुखावल्याबद्दल तुलाही वाईट वाटतंय, हे त्याच्याशी अवश्य बोल. कारण ‘तू मला दुखावलंस, मग मीही तुला दुखावणार,’ असा ‘हर्ट गेम’ पण नकळत घडत असतो. कालचा प्रसंग आठवून पाहिलास, तर तुला ‘पॉवर’ आणि ‘हर्ट’ दोन्ही दिसतील!’’ निकिता म्हणाली.
‘‘खरंय! निकिता, मध्यंतरी हर्षला एकट्यानं, सायकलवरून जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सर्वांसाठी चित्रपटाची तिकीटं काढून आणायची इच्छा होती. मी त्याला ‘नाही’ म्हणाले. आता उद्या पहिली तीच जबाबदारी देते. आमची नवीन सकारात्मक दोस्ती सुरू करते. मग ‘याच्याशी कसं वागायचं?’वालं माझं चक्र थांबवायचा रस्ता सापडेल बहुतेक… निकी, ही थिअरी मोठ्यांनाही लागू पडते का गं?’’ जरा थांबून ऐश्वर्यानं विचारलं.

‘‘अर्थात! मोठ्या माणसांची ‘स्व-ओळख’ जेव्हा लहानपणीच्या सोयीच्या व्याख्यांमध्येच अडकून बसते, तेव्हा असंच घडतं. जवळच्या नात्यांमध्ये दोघांनाही एकमेकांच्या हळव्या, दुखऱ्या जागा नेमक्या माहीत असतात. घरातल्याच कशाला, सामाजिक नात्यात ताण येतो, तेव्हाही ‘पॉवर’ आणि ‘हर्ट’चा खेळ येऊच शकतो.’’
‘‘तेव्हा काय करायचं?’’
‘‘मोठ्यांनी स्वत:ला प्रश्न विचारावे लागतात. उदा. ‘असं वागण्यामागे माझी गरज काय आहे?’, ‘समोरच्या व्यक्तीची गरज काय आहे?’, ‘वागण्यातून एकमेकांना नेमका संदेश कुठला जातोय?’ आणि ‘मला यातून परिणाम काय हवाय?’ या प्रश्नांची उत्तरं शोधायची सवय लागली, की चक्रांची गरगर थांबते. मात्र ही थिअरी समजून घेतली ना ऐशू, तरी वापरताना, ‘अंदाज अपना अपना, समझ अपनी अपनी’ असणार हे नक्की! मोठी माणसं निरागस नसतात. त्यामुळे उपायही थोडे वेगळे लागतात…’’ निकिता म्हणाली.
‘‘हं. थोडक्यात, प्रॉब्लेमचं आयतं उत्तर मिळणार नाही. स्वत:ला प्रश्न विचार, निरीक्षण आणि प्रयोग करून उत्तर शोध, असंच ना? चालतंय की!’’ खोडसाळपणे हसणाऱ्या निकिताला टाळी देत ऐश्वर्या म्हणाली.

neelima.kirane1@gmail.com