भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केल्यानंतर चीनने या भेटीवर आक्षेप घेतला. अमित शाहांच्या या दौऱ्यामुळे चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं उल्लंघन झाल्याचा दावा चीनने केला. यानंतर अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवरील गावात जाऊन चीनला प्रत्युत्तर दिलं. ते सोमवारी (१० एप्रिल) किबिथू गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ कार्यक्रमात बोलत होते.

अमित शाह म्हणाले, “कुणीही भारताच्या सीमेकडे डोळे वर करून पाहू शकणार नाही. भारताच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा काळ गेला. आता सुईच्या टोकाएवढ्या जमिनीवरही अतिक्रमण कुणी करू शकत नाही. कारण आयटीबीपी आणि भारतीय सैन्य इथं उपस्थित आहे. आपल्या कुटुंबापासून दूर इथं आपलं तारुण्य घालवणाऱ्या सर्व सैनिकांच्या त्याग, बलिदान, शौर्य आणि देशभक्तीला मी प्रणाम करतो.”

“अरुणाचल प्रदेशचे लोक भेटल्यावर नमस्कार बोलत नाहीत, तर…”

“अरुणाचल प्रदेशचे लोक भेटल्यावर नमस्कार बोलत नाहीत, तर जयहिंद बोलतात. याच भावनेने अरुणाचल प्रदेशला भारताशी जोडलं आहे. १९६२ मध्ये जे भारतावर अतिक्रमण करण्यासाठी आले होते त्यांना अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांच्या देशभक्तीने माघारी जावं लागलं होतं. देश अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांच्या या देशभक्तीला सलाम करतो. मीही त्यांच्या देशभक्तीला सलाम करतो,” असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं.

चीनने नेमका काय आक्षेप घेतला?

चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग वेंबिन म्हणाले, “अमित शाह यांच्या अरुणाचल आणि आसामच्या दौऱ्यात चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. हे सीमावर्ती भागातील शांततेसाठी चांगले नाही.”

चीनने रविवारी (९ एप्रिल) अरुणाचल प्रदेशमधील ११ ठिकाणांची नावं बदलली. तसेच ही सर्व ठिकाणं चीनची असल्याचाही दावा केला. हे सर्व ठिकाण तिबेटच्या दक्षिण क्षेत्राचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीनने दोन भूभाग, दोन रहिवासी भाग, पाच शिखरं आणि दोन नद्यांचा समावेश असलेली यादी जाहीर केली आहे. ही चीनने जाहीर केलेली तिसरी यादी आहे.

हेही वाचा : अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलून चीन काय साध्य करू इच्छितो?

याआधी २०१७ मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशमधील ६ भागांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली होती. २०२१ मध्ये १५ ठिकाणांचा समावेश असलेली दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती आणि आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.