नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकाधिक आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मलाच नव्हे तर, अनेक आमदारांना अजित पवारांच्या वतीने संपर्क साधला गेला होता. पण मी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले.
अजित पवार गट वा भाजपकडून लालूच दाखवले गेले होते का, या प्रश्नावर देशमुखांनी थेट भाष्य केले नाही. मात्र, भाजपने मला वसुली घोटाळय़ाच्या बनावट आरोपाखाली अडकवले, मला तुरुंगात जावे लागले, पण न्यायालयासमोर आरोप करणारेच उघडे पडले, खोटे आरोप केल्याची कबुली त्यांना द्यावी लागली. त्यामुळे माझी न्यायालयाने सुटका केली, अशा शब्दांत भाजपविरोधात राग व्यक्त केला.
माझ्यासह अनेक आमदार शरद पवारांसोबत आहेत. पक्षाचे ८० टक्के जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते पवारांशी एकनिष्ठ आहेत. आता पवारांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला गेलेल्या येवल्यात पवारांच्या सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्या-जिल्ह्यांत पवार जातील, तेव्हा वातावरण बदललेले असेल, असा दावा देशमुखांनी केला.
राज्यातील भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा खुला तमाशा जनता पाहात आहे. आधी शिवसेनेचे ३५-४० आमदार फोडले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. तरीही राज्यातील भाजपची स्थिती सुधारली नाही. राज्यातील सरकारला स्थैर्य आले नाही. मग, अजित पवारांसह काही आमदारांना फोडले. इतके करूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल याची खात्री नाही. मग, हे फोडाफोडीचे राजकारण करून भाजपच्या हाती काय लागले, असा सवाल देशमुख यांनी केला. जनतेच्या मनातून भाजप उतरला असून लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा जनतेला उबग आला आहे, असे देशमुख म्हणाले.