Firing Outside AP Dhillon’s Canada House : पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लनच्या कॅनडातील व्हँकुव्हर येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नसली तरीही व्हिक्टोरिया बेट परिसरात गायकाच्या घराजवळ गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचा दावा अनेक वृत्तांत करण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गोळीबाराचा एक व्हिडिओ समोर आला असून सुरक्षा यंत्रणांकडून या व्हिडिओची चौकशी सुरू झाली आहे. गायक एपी ढिल्लन यांच्या बंगल्यावर गोळीबार झाल्याचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. कॅनडातील व्हँकुव्हर येथील व्हिक्टोरिया बेटावर एका प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे.

हेही वाचा >> संजू बाबा व भाईजान अनेक वर्षांनी एकत्र करणार काम! प्रसिद्ध गायकाने शेअर केली पोस्ट

व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलंय?

पोस्टमध्ये लिहिलंय की, १ सप्टेंबरच्या रात्री दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. व्हिक्टोरिया आयलंड आणि वुडब्रिज टोरंटो. मी लॉरेन्स बिश्नोई गँगमधील रोहित गोदारा या गोळीबाराच्या दोन्ही घटनांची जबाबदारी घेतो.

या पोस्टमध्ये पुढे असा दावा करण्यात आलाय की, व्हिक्टोरिया आयलंडमधील घर एपी ढिल्लोनचे आहे. सलमान खानला त्याच्या गाण्यात घेतल्याने त्याला आनंद होत आहे. पण आम्ही तुझ्या घरी आलो तेव्हा बाहेर येऊन तुझी अॅक्शन दाखवायची होतीस. ज्या अंडरवर्ल्डला तुम्ही कॉपी करता ते जीवन आम्ही स्वतः जगतो आहोत. त्यामुळे तू तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर जनावराप्रमाणे तुला मारून टाकू”, अशी धमकी या पोस्टमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या पोस्टची खातरजमा अद्यापही झाली नसून सुरक्षा यंत्रणांकडून याची माहिती मिळवली जात आहे.

दरम्यान, व्हायरल पोस्टनुसार १ सप्टेंबरच्या रात्री घरावर गोळीबार झाला. परंतु, एपी ढिल्लोनच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तो काही तासांपूर्वी पार्टी करत होता, असं दिसतंय. दरम्यान, गोळीबारप्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत माहिती आलेली नाही.