Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी ओबीसींच्या मुद्यांवर बोलताना महत्वाचं भाष्य केलं. यावेळी बोलताना राहुल गांधींनी एक चूक झाल्याचं म्हणत ती चूक आता सुधारायची असल्याचं म्हटलं. जातनिहाय जनगणना न करणं ही माझी चूक होती, आपल्याला याबाबत पश्चात्ताप आहे. पण आता चूक सुधारायची आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या विधानावर बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जोरदार टीका केली आहे. ‘राहुल गांधींच्या नशिबात कायमच माफी मागणं लिहिलंय’, असं म्हणत आता राहुल गांधी जे करत आहेत त्यासाठी पुन्हा पुढच्या १० वर्षांनी माफी मागतील असा घणाघातही कृषीमंत्री चौहान यांनी केला.

शिवराज सिंह चौहान काय म्हणाले?

“राहुल गांधी यांना खूप उशिरा समजते. आधी राहुल गांधींनी आणीबाणीसाठी माफी मागितली. त्यानंतर त्यांनी शीख दंगलींच्या प्रकरणासंदर्भात माफी मागितली. त्यानंतर आता राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागितली. काँग्रेसने ओबीसींसाठी काय केलं? ओबीसींच्या कल्याणासाठी काँग्रेसने काम केलं नाही उलट ओबीसींना चिरडण्याचं काम काँग्रेसने केलं. तसेच राफेल प्रकरणातही राहुल गांधी यांनी माफी मागितली. आता राहुल गांधी जे करत आहेत त्यासाठी १० वर्षांनी ते पुन्हा माफी मागतील. राहुल गांधी कधीही योग्य काम करत नाहीत आणि नंतर दहा वर्षांनी माफी मागतात. त्यामुळे राहुल गांधींच्या नशिबात कायमच माफी मागणं लिहिलेलं आहे”, अशी टीका कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

“मी २००४ पासून राजकारणात आहे. जेव्हा मागे वळून पाहतो आणि आत्मचिंतन करतो तेव्हा कुठे योग्य काम केलं आणि कुठे नाही हे उमजतं. माझ्या दृष्टीने दोन ते तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. भूसंपादन विधेयक, मनरेगा, खाद्यान्न विधेयक, आदिवासींसाठी लढा. या गोष्टी मी चुकीच्या केल्या. तथापि, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचा विचार केला तर मला चांगले गुण मिळायला हवे”, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.

“ओबीसींचं रक्षण जसं करायला हवं होतं, तसं केलं नाही. मी कमी पडलो. कारण त्यावेळी मी तुमचे मुद्दे खोलवर समजू शकलो नाही. पण मला आता वाईट वाटतं की जर मला तुमच्या (ओबीसी) इतिहासाबद्दल, तुमच्या समस्यांबद्दल थोडं जास्त माहिती असतं तर मी त्यावेळी जातीय जनगणना केली असती. ही माझी चूक होती. ही काँग्रेस पक्षाची चूक नाही, ती माझी चूक आहे. मात्र, आता मी ती चूक सुधारणार आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.