MLA Aminul Islam on Pahalgam: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) पक्षाचे नेते आणि ढिंग विधानसभेचे आमदार अमिनूल इस्लाम यांनी मात्र या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर त्यांच्यावर आसाम पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची भलामण करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, अशा इशारा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कारवाईनंतर दिला.

आमदार अमिनूल इस्लाम यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तसेच २०१९ साली पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामागेही केंद्र सरकारचा हात होता, असेही ते म्हणाले. पहलगाम येथील हल्ल्यात २६ तर पुलवामा हल्ल्यात ४२ जणांचा जीव गेला होता.

अमिनूल इस्लाम म्हणाले की, २०१९ साली पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४२ जवान मारले गेले होते. मी तेव्हाच म्हणालो होतो की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणला गेला. या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशीही मागणी तेव्हा केली होती.

“पहलगाम येथील हल्ल्यानंतर भाजपाकडून देशभरात एक नरेटिव्ह पसरवले जात आहे. अतिरेक्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला आणि फक्त बिगरमुस्लीमांना गोळ्या घातल्या. मात्र हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी याला दुजोरा दिलेला नाही. अतिरेक्यांनी कुणालाही नाव न विचारता काही अंतरावरून गोळ्या झाडल्याची बाब समोर आली आहे”, असा दावा आमदार अमिनूल इस्लाम यांनी केला होता.

आमदार अमिनूल इस्लाम यांचे वादग्रस्त विधान

आमदार इस्लाम यांचे विधान सोशल मीडियावर पसरले असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. त्यानंतर इस्लाम यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसाम पोलिसांची एक्स पोस्ट शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. “पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या समर्थन करणाऱ्यांवर अशाचप्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल”, असा इशारा सरमा यांनी दिला.