Pro Pakistan Social Media Posts: जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान समर्थक भूमिका घेतल्याबद्दल आसाममध्ये आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या अटकेसह सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने नारे दिल्याने अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या नऊ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

सरमा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “करीमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सायकुट गावातील कबीर अहमद यांचा मुलगा मोहम्मद मुस्ताक अहमद उर्फ ​​साहेल याला फेसबुकवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’, अशी पोस्ट केल्याबद्दल काल रात्री अटक करण्यात आली आहे.”

तत्पूर्वी शुक्रवारी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी, “पहलगाममधील भयानक हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या किंवा त्याचे समर्थन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आसाम सहन करणार नाही”, असे म्हटले होते. या पोस्टबरोबर त्यांनी आतापर्यंत, सोशल मीडियावर पाकिस्तानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्याबद्दल सहा जणांना अटक केल्याची माहिती दिली होती.

सरमा यांनी शुक्रवारीच केलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये, पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या पोस्ट करणाऱ्या दोघांना बारपेटा आणि विश्वनाथ येथून अटक केल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये देशभारातील २५ आणि नेपाळचा एक अशा एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

भारताची कठोर पाऊले

या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिल रोजी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, व्हिसा संबंधित हे नियम हिंदू असलेल्या आणि भारतात राहण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा मिळालेल्या पाकिस्तानी नागरिकांना लागू होणार नाहीत. तसेच, जे लोक वैध कागदपत्रांसह पाकिस्तानला गेले आहेत त्यांना १ मे पूर्वी भारतात येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१९१ पाकिस्तानी नागरिकांनी सोडला भारत

भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर, पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे पाकिस्तानात परत जात आहेत. कालपर्यंत १९१ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत. तर २८७ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.