खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या दिल्लीत दाखल झाली आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज (२४ डिसेंबर) येथे सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. हे नरेंद्र मोदी यांचे नव्हे तर अदानी-अंबानी यांचे सरकार आहे. छोट्या उद्योगांना नष्ट करण्यात आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच देशात माध्यमांवर २४ तास फक्त हिंदू-मुस्लीम वादावर चर्चा घडवून आणली जाते. मात्र देशातील मुख्य मुद्द्यांवरील लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा कायम चर्चेत असतो. प्रत्यक्षात देशात तसे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा >> मोदी सरकारचा मोठा निर्णय: चीन, जपानसह ‘या’ देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी बंधनकारक!
“देशात माध्यमांमध्ये फक्त हिंदू-मुस्लीम वादावर चर्चा घडवून आणली जाते. मात्र माध्यमांवर दाखवला जात असलेला हा संघर्ष खरा नाही. देशात खूप प्रेम आहे. मी यात्रेत लाखो लोकांना भेटलो आहे. देशातील सामान्य नागरिक एकमेकांवर प्रेम करतात. देशातील ९० टक्के लोक जात, प्रांत, धर्म या बाबी सोडून एकमेकांवर प्रेम करतात. देशातील लोक प्रेमाने एकमेकांसोबत राहतात. देशातील प्रमुख समस्यांवरील लक्ष हटवण्यासाठी हिंदू-मुस्लीम संघर्ष दाखवला जातो. हे नरेंद्र मोदी यांचे नव्हे तर अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा >> नरेंद्र मोदींच्या पोषाखावरील आक्षेपार्ह टिप्पणीनंतर संताप, तृणमूलच्या नेत्याने मागितली माफी
“मी आतापर्यंत २८०० किलोमीटर अंतर चालत आलो आहे. या प्रवासात मला आतापर्यंत कुठेही हिंसा, चीड दिसलेली नाही. मात्र मी जेव्हा वृत्तवाहिन्या पाहतो तेव्हा मला २४ तास मारझोड, हिंसा, द्वेष दिसतो. देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष जाऊ नये, म्हणूनच हिंदू-मुस्लीम वाद दाखवला जातो,” असेही राहुल गांधी म्हणाले.
“माध्यमांचे लक्ष देशातील युवकांवर जायला हवे. आज देशातील युवक सांगेल की आम्ही अभ्यास केला. शालेय, पदवी, पदव्युत्तर पदवी असे शिक्षण झाले आहे, मात्र मी आता पकोडे विकतोय, असे येथील युवक सांगेल. देशात बेरोजगारी आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
