देशभरातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने मुंबईत समन्वय समितीची घोषणा केली. यानंतर बुधवारी (१३ सप्टेंबर) दिल्लीत शरद पवारांच्या घरी या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत समितीने महत्त्वाचे निर्णय घेतले. यानुसार इंडिया आघाडी पुढील काळात देशभरात जाहीर सभा घेणार आहे. काँग्रेसचे नेते आणि समन्वय समितीचे सदस्य के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “आज शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. यात १२ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसचे अभिजीत बॅनर्जी यांना ईडीने समन्स पाठवल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय सुडाच्या भावनेने ही कारवाई केली आहे.”

“देशातील विविध भागात जाहीर सभा घेण्याचा निर्णय”

“समन्वय समितीने देशातील विविध भागात जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली जाहीर सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. या सभेत वाढती महागाई, बेरोजगारी आणि भाजपाच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील. याशिवाय समन्वय समितीने जातनिहाय गणनेचा विषयही चर्चेत घेतला,” असं के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “सरकारला मनोज जरांगे पाटलांना संपवायचं आहे, त्यांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत काय निर्णय?

के. सी. वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, “समन्वय समितीने ठरवलं आहे की, जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. विविध पक्षांचे सदस्य बैठका घेऊन जागावाटप लवकरात लवकर निश्चित करतील.”