नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जागावाटप घोषित केल्यामुळे विरोधकांच्या ‘महागठबंधन’वर जागावाटपासाठी दबाव वाढला आहे. मात्र, जागावाटपाची घोषणा होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो, असा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला. काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्यामध्ये जागांवरून रस्सीखेच सुरू असून या वेळी काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागेल असे संकेत दिले जात आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्यासह प्रमुख नेते दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत. ‘आयआरसीटीसी’ घोटाळाप्रकरणी यादव पिता-पुत्रांना दिल्लीतील ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात हजर राहावे लागले. मात्र, सोमवारी दिवसभर काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. तेजस्वी यादव यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जागावाटपावर अंंतिम चर्चा करण्यासाठी भेट घेतली. तेजस्वी यादव मंगळवारी पाटण्यात पोहोचणार असून त्यानंतर इतर घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर जागावाटपाची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

काँग्रेसला ५५ ते ६० जागा

काँग्रेसला ५५-६० जागांवर समाधान मानावे लागू शकते. गेल्या वेळी काँग्रेसने ७० जागा लढवून फक्त १९ जागा जिंकल्या होत्या. या वेळी तेजस्वी यादव काँग्रेसला जास्त जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळेही जागावाटपाची बोलणी रखडल्याचे सांगितले जाते. २४३ जागांपैकी राष्ट्रीय जनता दल १३०-१३५, काँग्रेस ५५-६०, माकप-माले २२-२५, विकासशील इन्सान पार्टी १८-२०, माकप-भाकप १०, उर्वरित जागा इतर घटक पक्षांना दिल्या जातील, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

‘एनडीए’मध्ये भाजपच मोठा भाऊ

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठक सुरू होण्यापूर्वीच पक्षाच्या नेत्यांनी ‘एनडीए’च्या जागावाटपाची घोषणा केली. भाजप व जनता दल (सं) हे दोन्ही पक्ष प्रत्येक १०१ अशा समान जागा लढवणार असले तरी, आता बिहारमधील ‘एनडीए’मध्ये भाजपच मोठा भाऊ झाल्याचे मानले जात आहे. गेल्या वेळी जनता दलाने (सं) ११५ आणि भाजपने ११० जागा लढवल्या होत्या. या वेळी स्वतःला मोदींचे हनुमान मानणारे चिराग पासवान हेही ‘एनडीए’मध्ये आले असून त्यांच्या लोकजनशक्ती (रामविलास पासवान) पक्षाला २९ जागा देण्यात आल्या आहेत. उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकमोर्चा व जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चाला प्रत्येक सहा जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजप १४२ जागा लढवत असल्याची चर्चा सत्तेच्या वर्तुळात रंगली आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रविवारी भाजपचे १०१ उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे समजते.