एएनआय, नवी दिल्ली, पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांच्या ‘महागठबंधन’ आघाडीत जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने भाजपने या आघाडीला लक्ष्य केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) ‘महागठबंधन’मधून माघार घेतल्यानंतर, या आघाडीचा कमकुवतपणा उघड झाला आहे, अशी टीका भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी केली.

राज्यातील काही जागांवर ‘राजद’ आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशी काही मैत्रीपूर्ण लढत नाही अशी टीका बिहारचे मंत्री संतोष सुमन यांनी केली. ते म्हणाले की, ‘महागठबंधन’ अर्धवट तुटलेले आहे. ‘राजद’ आणि काँग्रेसमध्ये भक्कम युती नाही. त्यांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. “बिहारच्या जनतेचा राहुल गांधींवर विश्वास नाही. ते इथे केवळ राजकीय पर्यटनासाठी येतात आणि जातात,” अशी टीका सुमन यांनी केली.

‘महागठबंधन’मध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे पक्ष आणि ‘व्हीआयपी’ या पक्षांचा समावेश आहे. ‘झामुमो’ने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकट्याच्या बळावर सहा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. त्यांनी सोमवारी निवडणुकीतूनही माघार घेतली. ‘झामुमो’चे नेते आणि झारखंडमधील मंत्री सुदिव्य कुमार यांनी ‘राजद’ व काँग्रेसवर राजकीय फसवणुकीचा आरोप केला. भविष्यात याचे परिणाम पाहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी दिला.

बिहारमध्ये एकूण २४३ मतदारसंघांवर निवडणूक होत आहे. सध्या ‘महागठबंधन’च्या घटक पक्षांमध्ये ‘राजद’ १४३, काँग्रेस ६१, भाकप (माले) २० जागांवर निवडणूक लढवत आहे. उर्वरित १९ जागा ‘व्हीआयपी’ला जाण्याची शक्यता आहे.

पप्पू यादव यांचा विश्वास कायम

दुसरीकडे, बिहारची जनता ‘महागठबंधन’बरोबर असून निवडणुकीत आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास पुर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी व्यक्त केला आहे. ते पाटण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “सर्व जनता एका बाजूने आहे. केवळ ‘महागठबंधन’चेच सरकार सत्तेत येईल. जनता एकजूट असल्यामुळे ती सर्वांची एकजूट घडवून आणेल.”

‘महागठबंधन’चा कमकुवतपणा उघड झाला आहे आणि ते अयशस्वी ठरले आहेत. या पक्षांनी निवडणुकीपूर्वीच हार मानली आहे. त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आघाडीच्या हितापेक्षा वरचढ ठरल्या आहेत. अशा लोकांचे भवितव्य वाईटच असते. – मुख्तार अब्बास नक्वी, नेते, भाजप