पीटीआय, नवी दिल्ली/पाटणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज रविवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत दुसऱ्यांदा ते भाजपबरोबर जातील हे स्पष्ट झाले आहे.पाटण्यात शनिवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. राष्ट्रीय जनता दलाने नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा गेल्यास रणनीतीबाबत चर्चा केली. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजप नेत्यांचीही बैठक झाली. सचिवालय रविवारी सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे, यामुळेच नितीशकुमार हे रविवारी राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. संयुक्त जनता दलाचे राजकीय सल्लागार तसेच प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी बिहारमधील महाआघाडी कोसळण्याच्या बेतात असल्याचे मान्य केले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सातत्याने नितीशकुमार यांचा अपमान केल्याचा आरोप त्यागी यांनी केला. पंजाब तसेच पश्चिम बंगालमध्येही इंडिया आघाडीतील पक्ष फुटण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यागी यांनी केला.

भाजप नेत्यांची बैठक

भाजप नेत्यांची पाटण्यात बैठक झाली. मात्र पाठिंब्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. नितीशकुमार यांनी राजीनामा देईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे निर्देश वरिष्ठ नेत्यांनी राज्य भाजपच्या नेत्यांना दिले आहे. नितीशकुमार यांनीही मौन बाळगले असून, महाआघाडीतील पक्षातील नेत्यांना प्रतिसाद दिला नाही. बक्सर येथे शनिवारी त्यांनी काही विकासकामांची सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव गैरहजर होते. या कार्यक्रमाला स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित होते. त्यांनीही राजकीय घडामोडींवर भाष्य टाळले. भाजपचे राज्य प्रभारी विनोद तावडे हे शनिवारी पाटण्यात होते. त्यांनीही प्रतिक्रिया दिली नाही. नितीशकुमार पाटण्याला पतरल्यावर त्यांच्या सरकारी निवासस्थानी पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपच्या पाठिंब्याने सरकार आणण्याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आले.

हेही वाचा >>>केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा

चिराग पासवान यांचा आक्षेप

नितीशकुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येत असल्याच्या वृत्तानंतर जुन्या घटक पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) गटाचे चिराग पासवान यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. आमच्या काही शंका होत्या त्या कानावर घातल्या. चित्र स्पष्ट झाल्यावर आम्ही भूमिका ठरवू असे त्यांनी नमूद केले. नितीशकुमार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश दिल्यास जागावाटपात लोकसभेला तिढा निर्माण होईल अशी भीती बिहारमधील मित्र पक्षांमध्ये आहे.

रणनीतीबाबत चर्चा

राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांची बैठक माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी पक्षाच्या नेत्यांना त्यांचे दूरध्वनी बाहेर ठेवण्यास सांगण्यात आले. नितीशकुमार हे आघाडीतून बाहेर गेल्यावर रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. काही नेत्यांनी सत्तेसाठी दावा करावा अशी मागणी केली. बहुमतासाठी केवळ आठ आमदार कमी आहेत. एकूण २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत भाजप व संयुक्त जनता दलाचे १२२ सदस्य होतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे बहुमत नसताना सत्तास्थापनेसाठी फारसे उत्सुक नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar chief minister nitish kumar is likely to resign on sunday