Bihar Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवत विरोधकांचे अशरक्षः पानिपत केले. एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयाचे वर्णन करताना बिहारच्या जनतेने विरोधकांचा खुर्दा उडवला, असे म्हटले आहे. तसेच बिहारच्या विजयामुळे पश्चिम बंगालच्या सत्तेचेही द्वार उघडले असल्याचे संकेत त्यांनी दिले. भाजपाने जदयुला बरोबर जोरदार मुसंडी मारल्याचे या निकालावरून दिसून आले. भाजपाने सर्वाधिक ८९ तर जदयुने ८५ जागांवर विजय मिळवला आहे.

२०२० साली राजद-काँग्रेसच्या महाआघाडीने एनडीएला चांगली टक्कर दिली होती. मागच्यावेळी राजदने ७५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने १९ ठिकाणी विजय मिळवला होता. २०२० च्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडून राजद-काँग्रेसबरोबर येऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी केली. त्यांचा हा राजकीय डाव यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. कारण २०२० साली केवळ ४३ जागा जिंकणाऱ्या नितीश कुमारांच्या जदयूने यावेळी थेट ८५ मतदारसंघात विजय मिळवला आहे.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाने अनपेक्षित यश मिळवले आहे. त्यांनी १९ जागांवर विजय मिळवला आहे. २०२० साली नितीश कुमार यांना नुकसान पोहोचवणाऱ्या चिराग पासवान आणि कुशवाह यांना एनडीएमध्ये सामील करून घेतल्यामुळे मतांचे विभाजन झाले नाही. ज्याचा लाभ सर्वच पक्षांना झालेला दिसत आहे. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला यश मिळू शकलेले नाही.

राजद-काँग्रेसचे पानिपत

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा पूर्ण विश्वास वाटत होता. मात्र निकालावरून त्यांचा दारूण पराभव झालेला दिसत आहे. राजदला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. २०२० साली ७५ जागा जिंकणाऱ्या राजदचा हा मोठा पराभव मानला जात आहे. तर काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. २०२० साली १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ ६ मतदारसंघात विजय मिळवता आला आहे.

पाहा सविस्तर आकडेवारी

आघाडीपक्ष२०२५
एनडीएभाजपा८९
जनता दल (संयुक्त) – जद(यू)८५
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – LJPRV१९
हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) – HAMS
राष्ट्रीय लोक मोर्चा – RSHTLKM
महाआघाडीराष्ट्रीय जनता दल – राजद२५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – आयएनसी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (मुक्ती) – सीपीआय (एमएल) (एल)
इंडियन इन्क्लूसिव्ह पार्टी – आयआयपी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) – सीपीआय(एम)
इतरऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन – AIMIM
बहुजन समाज पक्ष – बसपा
एकूण२४३

एनडीए २०० पार

केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) आणि कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी सहा जागा लढवत होते. या दोन पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. हिंदुस्तानी आवाम मोर्चाला ५ तर राष्ट्रीय लोक मोर्चाला ४ ठिकाणी विजय मिळाला आहे. यामुळे एनडीएच्या मित्रपक्षांची संख्या दोनशे पार झाली आहे. एनडीएकडे आता २०२ आमदारांचे संख्याबाळ आहे.

आघाडीपक्ष२०२० चा निकाल
एनडीएजनता दल (संयुक्त)४३
भारतीय जनता पक्ष७४
विकासशील इन्सान पार्टी
हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष)
महाआघाडीराष्ट्रीय जनता दल७५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस१९
सीपीआय (एमएल) लिबरेशन१२
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सीपीआय (मार्क्सवादी)
इतर
एकूण२४३

निवडणूक निष्पक्ष नव्हती – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या पराभवानंतर विरोधकांच्या महागठबंधनला मतदान करणाऱ्या बिहारच्या जनतेचे आभार मानले आहे. राहुल गांधी म्हणाले की, “मी बिहारच्या त्या कोट्यवधी मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. आम्ही एका अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याचे आपले प्रयत्न अधिक प्रभावी करतील.