Bihar Election Survey 2025: बिहारमध्ये या वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे उत्तरेतील या महत्त्वाच्या राज्यात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगामुळे उडालेला गोंधळ, प्रशांत किशोर यांची राजकारणातील एंट्री, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या जोडीने यात्रेच्या माध्यमातून उडवलेली राळ, भाजपाच्या योजना आणि नितीश कुमार यांची तब्बल दीड दशकाहून अधिकची सत्ता… याभोवती यंदाची निवडणूक फिरणार आहे. निवडणुकीआधी बिहारमध्ये वेगवेगळ्या संस्थांकडून सर्व्हे करण्यात येत आहेत. ज्यात जनतेचा कल दिसून येत आहे.

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, पुढील निवडणुकीत जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वोच्च पसंती नाहीत. नितीश कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मग पहिल्या स्थानावर बिहारच्या जनतेने कुणाला पसंती दिली?

मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, सी-व्होटरच्या सर्वेक्षणात दिसून आले की, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे.

राजकीय विश्लेषक आणि काही वर्षांपूर्वी राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांना दुसऱ्या क्रमाकांची पसंती देण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांनी अलीकडेच जन सुराज पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी बिहारच्या सर्व २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

नितीश कुमार हे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर चौथ्या स्थानावर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांचे नाव आहे. बिहारमधील लोजप (रामविलास) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री, एनडीएतील भागीदार चिराग पासवान यांना पाचव्या क्रमाकांची पसंती मिळाली आहे.

कोणाची लोकप्रियता कमी झाली? कुणाची वाढली?

सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, नितीश कुमार यांची लोकप्रियता तीन टक्क्यांनी घसरली असून आता ते १५ टक्क्यांवर आले आहेत. तेजस्वी यादव यांना पहिली पसंती मिळाली आहे. मात्र त्यांचीही लोकप्रियता ४०.६ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ३५.५ टक्क्यांपर्यंत घसरली. दरम्यान प्रशांत किशोर यांच्या लोकप्रियतेत मात्र दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

स्पीक मीडिया नेटवर्क आणि जेव्हीसी सर्वेनुसारही तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. स्पीक मीडिया नेटवर्कने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे. तर जेव्हीसीने नितीश कुमार यांना सर्वाधिक पसंती दिली आहे.