Bihar List : बिहार मतदार यादीसंबंधीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. या दरम्यान कपिल सिब्बल यांनी असा दावा केला की बिहारमध्ये मतदार याद्या तयार करताना सगळ्या संविधानिक तरतुदींना हरताळ फासण्यात आला.

कपिल सिब्बल यांचा दावा काय?

कपिल सिब्बल म्हणाले बिहारमध्ये मतदार याद्या तयार करताना मतदारांशी संबंधित दस्तावेजांबाबत अधिकाऱ्यांनी मनमानी केली आहे. तर वकील गोपाल शंकर नारायण यांनी हा आरोप केला की मतदार यादीतून अनेक लोकांची नावं वगळण्यात आली आहेत. ६५ लाख मतदारांची नावं मतदार याद्यांतून वगळण्यात आली आहेत असाही आरोप त्यांनी केला. तसंच एका छोट्या मतदारसंघात १२ जणांचा मृत्यू झाला आहे असं दाखवण्यात आलं आहे. त्याबाबत पडताळणी केली असता हे सगळे लोक जिवंत आहेत असं समोर आलं आहे.

जस्टिस सूर्यकांत काय म्हणाले?

आधी आम्ही याबाबत तपास करु. त्यानंतर आम्ही याबाबत कायदेशीर पर्यायाचा विचार करु. हे सांगताच वकील गोपाल शंकरनारायणन म्हणाले, की मागच्या तारखेला जस्टिस बागचींनी सांगितलं होतं की मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावं वगळण्यात आली असतील तर आम्ही या प्रकरणांत हस्तक्षेप करु. आता जी संख्या समोर येते आहे ती खरोखरच चकीत करणारी आहे. यावर कपिल सिब्बल म्हणाले की एकाच जिल्ह्यात १२ जण जिवंत आहेत असं सांगण्यात आलं जे लोक मृत आहेत. तर काही मतदारसंघांमध्ये मृत लोकांना जिवंत दाखवण्यात आलं आहे. या युक्तिवादानंतर वकील राकेश द्विवेदी म्हणाले मृतांना जिवंत दाखवण्यात आलं आणि जिवंत लोकांना मृत दाखवण्यात आलं या प्रकरणात तुम्ही BLO कडे संपर्क करा. त्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. बिहार विधानसभेची निवडणूक या वर्षात होण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी मतचोरीचं प्रकरण समोर आणलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय काय म्हटलं आहे?

सर्वोच्च न्यायालयाने विस्तृत रुपात सुनावणी सुरु केली.

आधी आम्ही प्रक्रियेचा योग्य पद्धतीने अभ्यास करु

प्रक्रिया योग्य असेल तर आम्ही वैधतेचा विचार करु

आमच्यासमोर काही तथ्यं मांडण्यात आली गेली पाहिजेत. निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे कारण ६५ लाख नावं गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद रंगला आहे.