बिहार पोलीस मुख्यालयाने गुरुवारी राज्यभरात हायअलर्ट जाहीर केला. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेले तीन अतिरेकी राज्यात शिरल्याची गुप्तवार्ता मिळाल्यानंतर बिहार पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून हा इशारा दिला आहे. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांची ओळख पटली असून त्यांनी अतिरेक्यांचे स्केचही सार्वजनिक केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रावळपिंडीमधील हसनैन अली, उमरकोट येथील आदिल हुसेन आणि बहावलपूर येथील मोहम्मद उस्मान अशी तीन अतिरेक्यांची नावे आहेत. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूला पोहोचले होते. मागच्या आठवड्यात त्यांनी बिहारमध्ये प्रवेश केला.
पोलिसांनी राज्याच्या सीमेवरील जिल्ह्या पोलिसांनी संशयित अतिरेक्यांच्या पासपोर्टशी संबंधित तपशील शेअर केले आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांना गस्त वाढविण्याचे आणि गुप्त सूचना गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या गुप्तचर विभागांना प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बिहारमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता भारत-नेपाळ सीमाभाग आणि सीमांचल जिल्ह्यांवर सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मधुबनी, सीतामढी, सुपौल, अररिया, पूर्व आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यांसह सीमावर्ती भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
बिहार आणि नेपाल यांच्यात ७२९ किमींची विस्तीर्ण अशी सीमा आहे. घुसखोरी आणि सीमेपलीकडून होणाऱ्या हालचालींसाठी बिहार हे एक प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यातील सात जिल्ह्ये खुल्या सीमेवर वसलेले आहेत. त्यामुळे या भागात सतत देखरेख आणि सुरक्षा पुरविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते.
पंतप्रधान मोदींचा अतिरेक्यांना इशारा
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये झालेल्या कार्यक्रमात या हल्ल्यावर पहिल्यांदा भाष्य केले होते. पहलगाम हल्ल्यामागे असलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करू, अशी प्रतिज्ञा त्यांनी बिहारमध्ये घेतली होती.
पहलगाम हल्ल्यासाठी सीमेपलीकडील दहशतवाद कारणीभूत असल्याचे आढळल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमध्ये एकूण नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले होते.
मागच्याच आठवड्यात बिहारमधील एका जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही बिहारच्या भूमीवर मी घेतलेली प्रतिज्ञा होती.