BJP Accuses Congress Of Altering Vande Mataram: भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर ८८ वर्षांपूर्वी वंदे मातरममध्ये बदल केल्याचा आरोप केला आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात दुर्गा मातेची स्तुती करणारा उल्लेख वंदे मातरममधून काढून टाकण्यात आला होता, असे पक्षाचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे आरोप अशा वेळी आले आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या १५० व्या वर्षाच्या निमित्ताने वर्षभर चालणाऱ्या उत्सवांचा शुभारंभ करणार आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सीआर केशवन यांनी एक्सवर लिहिले की, “आपल्या तरुण पिढीला हे माहित असले पाहिजे की काँग्रेसने आपल्या जातीय अजेंड्यासाठी १९३७ मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखाली फैजपूर अधिवेशनात वंदे मातरमचे संक्षिप्त रूप पक्षाचे राष्ट्रीय गीत म्हणून कसे स्वीकारले.”

त्यांनी पुढे लिहिले की, “ब्रिटिश काळात वंदे मातरम म्हणणे गुन्हा मानले जात होते. वंदे मातरम कोणत्याही धर्माचे किंवा भाषेचे नाही, परंतु काँग्रेसने ते धर्माशी जोडण्याचे ऐतिहासिक पाप केले. धार्मिक कारणांचा हवाला देऊन, नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जाणूनबुजून दुर्गा मातेची स्तुती करणारे उल्लेख वंदे मातरममधून काढून टाकले होते.”

सीआर केशवन यांनी यावेळी १ सप्टेंबर १९३७ रोजी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आणि म्हटले की, “नेहरूंनी लिहिले की, वंदे मातरमचे शब्द देवीशी जोडणे हास्यास्पद आहे. वंदे मातरम हे राष्ट्रगीतासाठी योग्य नाही. नेताजी सुभाष बोस यांनी वंदे मातरमच्या पूर्ण रूपाला पाठिंबा दिला होता. पण, २० ऑक्टोबर १९३७ रोजी नेहरूंनी नेताजी बोस यांना पत्र लिहून म्हटले की, वंदे मातरमची पार्श्वभूमी मुस्लिमांना नाराज करू शकते.”

राहुल गांधींही लक्ष्य

केशवन यांनी लिहिले की, “१९३७ मध्ये, काँग्रेस अध्यक्ष असताना नेहरूंनी वंदे मातरम लहान केले आणि दुर्गा मातेचा उल्लेख काढून टाकला. २०२४ मध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, ‘हिंदू धर्मात शक्ती नावाचा एक शब्द आहे आणि आपण शक्तीविरुद्ध लढत आहोत.'”

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण

पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या वर्षभर साजऱ्या होणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन होणार आहे.