नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला असून पुढील ३० वर्षे केंद्रात भाजपची सत्ता राहील यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी झालेल्या क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत दिल्याचे समजते. तसेच, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा देशभर उत्साहाने साजरा करा, केंद्र सरकारच्या योजनांचा विस्तार करा तसेच, महिला बचत गट, बुथ स्तरावर व तरुण मतदारांवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचनाही शहांनी केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघांसाठी नियुक्त केलेले १५६ क्लस्टरप्रमुखांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला संघटना महासचिव बी. एल. संतोष, राष्ट्रीय महासचिव उपस्थित होते.

हेही वाचा >>> उत्तर भारतातील धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत; प्रचंड विलंबामुळे प्रवासी संतप्त

देशातील ३ ते ४ लोकसभा मतदारसंघांचा एक क्लस्टर तयार करण्यात आला असून प्रत्येकासाठी क्लस्टर प्रमुखही नियुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघ १२ क्लस्टरमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक प्रमुखाकडे चार मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. आपापल्या क्लस्टरमधील तीन-चार मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवार कोण असू शकतात, याचा प्राथमिक आढावा घेण्याची सूचना भाजपच्या नेतृत्वाने केली होती.

राज्यातील नेत्यांची उपस्थिती

या बैठकीला राज्यातील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यापैकी काहींची नावे संभाव्य उमेदवार म्हणूनही घेतली जात आहेत. राज्यातील काही विद्यमान मंत्री व ज्येष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले जाण्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.

पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात?

भाजपने संभाव्य उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. २०१९च्या निवडणुकीत पराभव झालेल्या १६४ मतदारसंघांमधील उमेदवारांची यादी जानेवारीच्या अखेरीस वा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापर्यंत घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी मध्य प्रदेश व छत्तसीगढचे सूत्र वापरले जाऊ शकते.

नव्या चेहऱ्यांचा शोध

विद्यमान खासदारांच्या पाच वर्षांतील कामगिरीचाही आढावा घेण्यासही क्लस्टर प्रमुखांना सांगण्यात आले आहे. तीनपेक्षा जास्तवेळा विजयी झालेल्या खासदारांऐवजी तरुण व नवा चेहरा मैदानात उतरवला जाणार आहे. राज्यसभेचे सदस्य असलेल्या केंद्रातील मंत्र्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री पीयुष गोयल, निर्मला सीतारामन आदी नेत्यांना महाराष्ट्रातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp aims to be in power for next 30 years says amit shah zws