Bihar Election News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. यादरम्यान गुरुवारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने भाजपावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. या पक्षांनी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली निवडणुकीत मतदान केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार राकेश सिन्हा यांनी आज पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान केल्याचा आरोप केला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी वोट चोरीचा आरोप केला आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार आणि सर्वांना संस्कार शिकवणाऱ्या आरएसएसचे विचारक राकेश सिन्हा यांनी फेब्रुवारीमध्ये द्वारका येथून दिल्ली निवडणुकीत मतदान केले, आणि त्यानंतर आज त्यांनी सिवान येथून बिहार निवडणुकीत मतदान केले. त्यांनी हे उघडपणे फसवणुकीचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

“ते मोतीलाल नोहरू विद्यालय, दिल्ली विद्यापीठात शिकवतात, त्यामुळे हे इच्छा असूनही बिहारचा पत्ता दाखवू शकत नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल की भाजपाची चोरी पकडली गेली तर ते सुधारतील? तर अजिबात नाही. हे उघडपणे चोरी करतील,” असे भारद्वाज म्हणाले आहेत. त्यांनी एक्सवर यासंबंधिचे फोटो देखील पोस्ट केले आहे.

त्यांनी इतरही अनेक लोकांचे फोटो शेअर केले ज्यामध्ये राकेश सिन्हा यांचाही समावेश होता, ज्यांनी त्यांच्या दाव्यानुसार दिल्ली आणि बिहार अशा दोन्ही ठिकाणी मतदान केले. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देखील भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना पाठिंबा दर्शवला. त्या म्हणाल्या की, “भाजपा नेते राकेश सिन्हा यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केले. ५ नोव्हेबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केले. हे कोणत्या योजनेअंतर्गत होत आहे?”

या आरोपांना सिन्हा यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, फेब्रुवारीमधील दिल्ली निवडणुकीदरम्यान त्यांचे नाव दिल्लीच्या मतदार यादीत असले तरी, बिहारच्या राजकारणात सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांनी त्यांचा पत्ता बिहारमधील बेगुसराया येथील मनसेर पूर असा बदलून घेतला आहे. तसेच त्यांनी या आरोपांवरून मानहाणीचा खटला दाखल करण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

“राजकारण इतके हलके होऊ शकते याचा मला अंदाज नव्हता. संविधानावर आस्था ठेवणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी शंभर वेळा विचार केला पाहिजे. माझे नाव दिल्लीच्या मतदार यादीत होते. बिहारच्या राजकारणातील सक्रियतेमुळे मी आपले नाव गाव मनसेर पूर (बेगुसराया) करून घेतले आहे. या आरोपासाठी मी मानहानी खटला दाखल करावा का?” असे सिन्हा म्हणाले आहेत.

सिन्हा म्हणाले की त्यांचे वडिलोपार्जित घर बेगुसरायमध्ये आहे. “मी मातीतून उखडलेला माणूस नाही. मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी घेऊन आणि पैसे खर्च करून माझ्या गावी आलो. संविधानाच्या मूल्यांबद्दल कोण बोलत आहे? आम आदमी पार्टी लोकशाहीवरील कलंक आहे. डागाळलेल्या लोकांनी आरएसएसला नैतिकता शिकवू नये,” असे सिन्हा म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या अपजेट केलेल्या मतदार यादीचा फोटोही शेअर केला, ज्यात त्यांचा पत्ता बेगुसरायमधील मनसेरपूर असा दिलेला आहे.