कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केजरीवाल यांना अटक केल्यानंतर या घटनेवर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील या अटकेवरून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राहुल यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, एक घाबरलेला हुकूमशाह मृत लोकशाही बनवण्याच्या प्रयत्नात आहे. माध्यमांसह सर्व संस्था काबीज करणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणं, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणं हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होतं, म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधींसह इंडिया आघाडीतले प्रमुख नेते आणि सर्वच पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे आहेत. केजरीवालांच्या समर्थनात काँग्रेस सर्वात पुढे उभी आहे. परंतु, हाच काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी बनण्यापूर्वी कथित मद्य धोरण घोटाळ्यावरून आपला लक्ष्य करत होता. अनेक काँग्रेस नेत्यांनी मद्य धोरण घोटाळ्यावरून आपसह अरविंद केजरीवाल यांना धारेवर धरलं होतं. काँग्रेस नेते अजय माकन यांनी कथित मद्य धोरण घोटाळ्यावरून आपवर टीका केली होती. माकन यांनी या घोटाळ्याचं विश्लेषण केलं होतं. या विश्लेषणाचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. भाजपाचे नेते हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत.

अजय माकन यांनी म्हटलं होतं की, मद्य धोरण घोटाळा काय आहे ते एव्हाना सिद्ध झालं आहे. या घोटाळ्यात आम आदमी पार्टीने कमीत कमी १०० कोटी रुपयांची लाच घेतली आहे. यामध्ये आधी केजरीवाल यांची व्यावसायिकांशी बोलणी झाली. त्यानंतर घाऊक व्यापाऱ्यांना १२ टक्के दलाली दिली. ही दलाली पूर्वी पाच टक्के होती जी वाढवून १२ टक्के करण्यात आली. त्याचबरोबर आम आदमी पार्टीने विक्रेत्यांपुढे अट ठेवली की, या दलालीचा सहा टक्के हिस्सा पक्षाला (आपला) दिला जावा. याद्वारे आम आदमी पार्टीने १०० कोटी रुपये उकळले आणि हे पैसे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात प्रचार करण्यासाठी वापरले.

माकन म्हणाले होते, १०० कोटी रुपये खर्चून आपने गोव्यात काँग्रेसची मतं फोडली. या १०० कोटींमधले काही पैसे आपने तिथल्या जाहिरांतीवर खर्च केले. केवळ काँग्रेसचं नुकसान करण्यासाठी केजरीवाल यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्यमुळे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना यावर बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांना त्यांच्या पदावर बसण्याचा अधिकार नाही. मद्य धोरणात आम आदमी पार्टीने ६ टक्के दलाली वसुल केली आहे. ईडीने या पैशांचा माग काढल्यानंतर समजलं की, हे पैसे गोव्याच्या निवडणुकीत जाहिरातींवर खर्च करण्यात आले. हरियाणा आणि गोव्याच्या निवडणुकीत आपने खर्च केलेले पैसे कुठून आले, तिथल्या कार्यकर्त्यांना पैसे कुठून मिळाले, याबाबतची माहिती ईडीने त्यांच्या आरोपपत्रात दिली आहे.

हे ही वाचा >> केजरीवालांच्या अटकेचं काँग्रेस नेत्याकडून समर्थन? घोटाळ्याचं विश्लेषण करणारा व्हिडीओ भाजपाकडून शेअर

भाजपाकडून व्हिडीओचा गैरवापर

भाजपाने शेअर केलेला व्हिडीओ एक वर्ष जुना आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये एका पत्रकार परिषदेत अजय माकन यांनी आपवर गंभीर आरोप केले होते. परंतु, भाजपा आता तोच व्हिडीओ शेअर करून वेगवेगळे दावे करत आहे. काँग्रेसने केजरीवाल यांच्या अटकेचं समर्थन केल्याचा दावा भाजपा नेत्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट्सद्वारे केला आहे. परंतु, काँग्रेसने या अटकेचं समर्थन केलेलं नाही. उलट काँग्रेस सध्या आपबरोबर उभी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ajay maken old clip on delhi liquor scam shared by bjp with misleading text asc