भुवनेश्वर : पक्षाकडून निधी मिळत नसल्याचा आरोप करत पुरी लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. तसेच त्यांनी पक्षाची उमेदवारी परत केली. काँग्रेसचे माजी खासदार ब्रजमोहन मोहंती यांची कन्या असलेल्या सुचरिता यांनी शुक्रवारी काँग्रेसचे सरचिटणीस यांना ई-मेल पाठवून निधी नाकारल्याने पुरी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला मोठा फटका बसल्याचा दावा केला आहे. ओडिशा काँग्रेसचे प्रभारी अजोय कुमार यांनी स्पष्टपणे स्वत:च्या खर्चातून निवडणूक प्रचार करण्यास सांगितल्याचा आरोप मोहंती यांनी केला.

‘मी व्यावसायिक पत्रकार होते, जिने १० वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. पुरोगामी राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी मी देणगी गोळा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आतापर्यंत फारसे यश मिळाले नाही. ‘निधी गोळा करण्यास असमर्थ ठरल्याने पुरी लोकसभा मतदारसंघात प्रभावी प्रचारात निधी मिळावा म्हणून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासह सर्व वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता. केवळ निधीची कमतरता असल्यानेच पुरीमधील विजयापासून आम्ही दूर असल्याचे स्पष्ट आहे. उमेदवारी परत केली असली तरी मी निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता कायम राहणार असून, राहुल गांधी हेच आमचे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> प्रज्ज्वलविरोधात सीबीआयची ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’? राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र; पीडितांना सहाय्याचे आवाहन

माध्यमांशी बोलताना मोहंती म्हणाल्या की, मला पक्षाकडून निधी नाकारला गेला. पुरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कमकुवत उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दलाकडे प्रचंड पैसा आहे.  पुरी लोकसभेतून भाजपतर्फे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा तर बीजेडीतर्फे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनाईक निवडणूक रिंगणात आहेत.  उमेदवार जेव्हा प्रचार सुरू करेल आणि गंभीरपणे लढेल, तेव्हाच निधी दिला जाईल. निवडणूक मैदानात येण्यापूर्वीच मोहंती यांनी निधी दिला नसल्याचा आरोप केला आहे.

पक्षाने पुरी लोकसभेचा उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. – अजोय कुमार, ओडिशा काँग्रेस प्रभारी