Congress deletes Gayab post targeting PM Modi : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. यादरम्यान सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस पक्षात देखील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ही पोस्ट सोमवारी रात्री पोस्ट करण्यात आली होती, यामुळे भारतीय जनता पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. विशेषतः पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी देखील ही पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर भाजपाने काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते.

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींची अनुपस्थिति अधोरेखित करत काँग्रेसने एक डोके नसलेल्या व्यक्तीचे पोस्टर पोस्ट केले होते. पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे थेट नाव घेतले नसले तरी, कॅप्शनमध्ये “जबाबदारीच्या वेळी गायब होतात,” असे स्पष्टपणे लिहीले होते. म्हणजेच ही टीका पंतप्रधान मोदी यांना उद्देशून होती हे स्पष्ट होते.

दरम्यान भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी भारतातील नागरिकांच्या दबावामुळे काँग्रेसने ‘गायब’ पोस्ट डिलिट केल्याच्या दावा केला आहे. “भारतीय नागरिकांच्या दबावाखाली काँग्रेस पक्षाने त्यांचे ‘सर तन से जुदा’ हे इमेजरी ट्विट डिलीट केले आहे! यामुळे काँग्रेसचे राष्ट्रविरोधी पाकिस्तान समर्थक गुणधर्म लपणार नाहीत!” असे ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

त्यानंतर भारतीय जनता पक्षाने देखील याला प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी पाठीमागे हातात खंजीर घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा पाठमोरा फोटो पोस्ट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. या फोटोला ‘पाकिस्तान के यार’ असे कॅप्शन देण्यात आले होते.

दरम्यान काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सु्प्रिया श्रीनाते यांना ही पोस्ट डिलिट करण्यास सांगण्यात आल्याचे इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पक्षाच्या विचारांपासून दूर जाणाऱ्या कंटेंटला परवानगी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मीडिया डिपार्टमेंटबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या पोस्टमुळे पक्ष बॅकफुटवर आला असून यामधून त्याला नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे