नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी कर्नाटकातील भाजप सरकारचे भ्रष्ट म्हणून वर्णन केले आणि या राज्यात भाजपचे ‘विकलेले शासन’ असल्याचा आरोप केला. काँग्रेसने २०१९ ते २०२३ या दरम्यान भाजप सरकारच्या भ्रष्टाचार दर यादीचे पोस्टर प्रसिद्ध केले आणि भाजप सरकार ‘डबल इंजिन’ नव्हे तर ‘ट्रबल इंजिन’ सरकार आहे, असा आरोपही काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराच्या दर यादीचे एक पोस्टर प्रसिद्ध करत राहुल गांधी म्हणाले, ‘‘कर्नाटकातील जनता भाजपला केवळ ४० जागा देणार आहेत. कारण या संख्येच्या प्रेमात हा पक्ष आहे. कारण या पक्षाचे राज्यातील सरकार ४० टक्के कमिशन सरकार आहे.’’ काँग्रेसचे कर्नाटकमधील प्रभारी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ‘‘४० अंक भाजपमध्ये रुजला आहे. आज पंतप्रधानांनी बंगळूरुमध्ये ४० किलोमीटरचा केलेला रोड शो ४० टक्के भाजप सरकारचे प्रतीक दर्शवत आहे. मणिपूर जळत असताना, पंतप्रधान निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत. पंतप्रधान हे राजधर्माचे पालन करतात का?’’
‘नीट’परीक्षेमुळे पंतप्रधानांच्या ‘रोड शो’मध्ये बदल
बंगळूरु : जनभावनेचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळूरुमधील आठ तासांचा रोड शो रद्द करून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा रोड शो आयोजित करण्यात आला. मात्र रविवार, ७ मे रोजी नीट परीक्षा असल्याने भाजपने पुन्हा कार्यक्रमात बदल केला आहे. शनिवार, ६ मे रोजी विस्तृत कार्यक्रम आणि ७ मे रोजी लहान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली. रविवारी २६ किलोमीटरच्या रोड शोमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होईल. त्यामुळे या कार्यक्रमात बदल करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकशाही रक्षणासाठी कर्नाटक निवडणूक निर्णायक : पृथ्वीराज चव्हाण
मंगळुरू : देश आता अघोषित आणीबाणीचा अनुभव घेत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी चव्हाण येथे आले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण यांनी सांगितले की, देशातील घटनात्मक संस्थांना मुक्तपणे काम करू दिले जात नाही. त्यामुळे अघोषित आणीबाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुका ही केवळ या राज्यासाठीच नव्हे तर, देशातील लोकशाहीच्या रक्षाणासाठीही निर्णायक आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी निर्णायक निवडणूक असेल, असे ते म्हणाले.
कायद्याच्या चौकटीत वागल्यास बजरंग दलावर बंदीचा प्रश्नच नाही -वीरप्पा मोईली
बंगळुरू : बजरंग दल नियमानुसार कार्यरत असेल आणि त्यांचे कार्य योग्य असेल तर या संघटनेवर बंदी घालण्याचा प्रश्न येत नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात या संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
मोईली म्हणाले की, काँग्रेसने बजरंग दलाला एक प्रकारे नोटीस दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला सत्ता मिळाली तर या संघटनेवर बंद घातली जाईल, असे नाही.
या मुद्दय़ावर माजी मुख्यमंत्र्यांनी सूचित केले की, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टिकोनाचा काँग्रेस अवलंब करेल. त्यांनी सांगितले की, पटेल यांनी ‘आरएसएस’कडून बेकायदा कारवायांमध्ये सहभागी होणार नाही, अशी हमी घेतल्यानंतर या संघटनेवरील बंदी मागे घेतली होती.