पाटणा : बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’मुळे एकतर्फी मतचोरीला आळा बसेल असा सूर उमटू लागला आहे. ही यात्रा काढली नसती तर मतदानाचा हक्क पुन्हा बहाल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे भाजपच्या बाजूने झाली असती. त्याचा मोठा फटका काँग्रेस आघाडीला मतदानाआधीच बसला असता, असा दुजोरा बिहारमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्याने दिला.

बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेनंतर ६५ लाख मतदारांना वगळण्यात आले आहे. मात्र, त्यावर हरकत घेण्याची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. शिवाय, आधारकार्डही ग्राह्य धरले जाणार असल्याने काही लाख मतदारांना मतदानाचा हक्क पुन्हा मिळू शकतो. हे लाखो मतदार कोणाचा फायदा करून देणार यावर बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून असेल, असे मानले जात आहे. “काँग्रेसच्या यात्रेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगावर दबाव वाढू लागला आहे. आता यात्रेमुळे काँग्रेस आघाडीची संभाव्य ‘मते’ आम्हाला वाचवता येऊ शकतील,” असा दावा बिहारमधील माजी मंत्र्याने केला.

पण, काँग्रेस ही संभाव्य ‘मते’ वाचवण्यात किती यशस्वी होईल, या प्रश्नावर काँग्रेसच्या चार दशके आमदार असलेल्या नेत्याने, “काँग्रेसच्या नेत्यांचा यात्रेमध्ये मौल्यवान वेळ वाया जात आहे”, अशी कबुली दिली. ब्लॉक स्तरावरील निवडणूक अधिकारी लोकांचे ऐकण्याची शक्यता नाही. काँग्रेसचे नेत्यांनाच प्रत्यक्ष हजर राहून ब्लॉक स्तरावर वगळलेल्या मतदारांची शहानिशा करावी लागेल. तरच, निवडणूक अधिकाऱ्यावर दवाब येईल आणि मतदानाचा हक्क बहाल होईल. त्यासाठी काँग्रेसला नेत्यांना, कार्यकर्त्यांना सक्रिय करावे लागेल, असा मुद्दा या नेत्याने मांडला.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल व डाव्यांच्या महागठबंधन आघाडीपेक्षा केवळ १२,७०० मते जास्त मिळाली होती. त्यामुळे पाच-सात जागा महागठबंधनला कमी मिळाल्या होत्या, असे अनुभवी काँग्रेसचे म्हणणे होते. दोन्ही आघाडीतील मताधिक्यातील अत्यल्प फरक पाहता यावेळी बिहारमध्ये मतदारांना मताचा हक्क पुन्हा मिळवून देण्याची प्रक्रिया हीच काँग्रेससाठी मोठी कसोटी असेल असे मानले जात आहे.

तर बिहारचे ‘दिल्ली’ होईल!

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी महागठबंधनमधील नेत्यांना एकजुटीचे आवाहन केले असले तरी, जागावाटपात काँग्रेसला ५० पेक्षा कमी जागा दिल्या तर, बिहारचे ‘दिल्ली’ होईल, असा इशारा काँग्रेसकडून राष्ट्रीय जनता दलाला दिला जात आहे. गेल्यावेळी काँग्रेसला ७० जागा देण्यात आल्या होत्या, मात्र फक्त १९ जागा जिंकता आल्या. काँग्रेसची संघटना कमकुवत असल्यामुळे ५०-५५ पेक्षा जास्त जागा मागू नका, असे राष्ट्रीय जनता दलाने स्षष्ट केले आहे. पण, त्यापेक्षाही कमी जागा दिल्या तर काँग्रेसने दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चा पराभव केला, त्याची बिहारमध्ये काँग्रेस पुनरावृत्ती करू शकेल, असे मानले जात आहे.