सासाराम (बिहार) : पाटणापासून तीन तासांच्या अंतरावर, दक्षिण बिहारच्या सासाराममधून काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवतील. सासारामपासून राहुल गांधींची ‘व्होटर अधिकार यात्रा’ सुरू होईल. या यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाला आणखी कोंडीत पकडण्याची रणनिती काँग्रेसने आखल्याचे मानले जात आहे. यात्रेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हेही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेअंतर्गत जाहीर केलेल्या मसुदा मतदारयाद्यांमधून बिहारमधील सुमारे ६५ लाख मतदारांना मतदार यादीतून वगळले आहे. या मोहिमेमुळे विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यातील तणाव वाढत असताना बिहारमधून राहुल गांधी ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढत आहेत. त्यांची ही तिसरी यात्रा आहे.
या आधी ‘भारत जोडो यात्रा’ ही संपूर्ण दक्षिण-उत्तर भारत पदयात्रेने राहुल गांधींनी पालथा घातला होता. त्यानंतर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पूर्व-पश्चिम काढली होती. या दोन्ही यात्रांचा निवडणुकांशी काहीही संबंध नव्हता. पण, ही यात्रा थेट बिहारच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणारी असेल.
बिहारमधील २० जिल्ह्यांमधून राहुल गांधींची ही यात्रा जाईल. यात्रेचा निश्चित केलेल्या या मार्गावरील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा किमान एक तरी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असे मानले जात आहे. या उमेदवारांना जिंकण्याची ही सर्वात जास्त संधी असेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवून फक्त १९ जागा जिंकल्या होत्या.
यावेळी काँग्रेस ५०-५५ जागा लढवण्याची शक्यता आहे. या जागाही काँग्रेसला जिकण्याची संधी अधिक असेल हे पाहूनच पदरात पाडून घेतल्या जातील. यात्रेतून या संभाव्य जागांवर काँग्रेसला बळ मिळेल असे मानले जात आहे. ‘एसआयआर’मुळे मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे.
सासाराम ही माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांची भूमी. इथून ‘व्होटर अधिकार यात्रा’ सुरू करून ओबीसी व अतिमागास समाजाला चुचकारण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. रविवारी मोठ्या जाहीर सभेने यात्रेची सुरुवात होईल. या वेळी महागठबंधनचे घटक पक्ष उपस्थित राहतील.
यात्रेची रूपरेखा
ही यात्रा पूर्वेकडे पूर्णिया, उत्तरेकडील सीतामढी, पश्चिमेकडील चंपारण आणि दक्षिणेस छपरा असा प्रवास करेल. १ सप्टेंबर रोजी पाटणा मध्ये जाहीर सभा घेऊन ही यात्रा संपेल. यात्रा संमिश्र स्वरुपाची असेल. सकाळच्या सत्रात राहुल गांधी वाहनाने प्रवास करतील व संध्याकाळी पदयात्रा काढली जाईल.
१६ दिवस, २०पेक्षा अधिक जिल्हे, १३००पेक्षा जास्त किलोमीटर अंतर. आम्ही ‘व्होटर अधिकार यात्रे’सह जनतेत येत आहोत. एक व्यक्ती, एक मत या लोकशाहीतीली सर्वात मूलभूत हक्काटे संरक्षण करण्यासाठी हा लढा आहे. संविधान वाचवण्यासाठी आमच्याबरोबर बिहारमध्ये सहभागी व्हा.
– राहुल गांधी, नेते, काँग्रेस