काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी तीन महिन्यांपूर्वी काढून घेण्यात आली. भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत चुकीच्या पद्धतीने भाष्य केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधींना त्यांचं शासकीय निवासस्थानही सोडावं लागलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून राहुल गांधी त्यांच्या आई व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहात होते. आता राहुल गांधींना निवासस्थान मिळाल्याचं सांगितलं जात आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून लवकरच राहुल गांधींचा पत्ता बदलण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधी अपात्रता, नंतर सोडला बंगला

या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधींना अपात्र ठरवण्याची कारवाई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली होती. या कारवाईवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. अशा कारवाईला आव्हान देण्यासाठी संबंधित सभासदाला काही दिवसांचा अवधी दिला जातो, मात्र राहुल गांधींना तो अवधी देण्यात आला नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र, तरीही कारवाई कायम राहिल्यानंतर राहुल गांधींनी आपला बंगला २२ एप्रिल रोजी सोडला.

बंगला सोडल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील बंगल्यात वास्तव्यास गेले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ते १० जनपथ येथेच राहात आहेत. मात्र, आता लवकरच त्यांचा पत्ता बदलणार असून त्यांचं नवीन निवासस्थान ठरल्याचं सांगितलं जात आहे.

कुठे राहणार राहुल गांधी?

बंगला सोडल्यानंतर राहुल गांधींना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपलं घर राहण्यासाठी देऊ केलं होतं. मात्र, राहुल गांधींनी त्यास नकार दिला होता. मात्र, आता अखेर त्यांनी स्वत:साठी निवासस्थानाची निवड केल्याचं बोललं जात आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. निजामुद्दीन ईस्ट बी-टू परिसरातील हे घर हा राहुल गांधींचा नवा पत्ता असण्याची शक्यता आहे.

शीला दीक्षित या १९९१ ते १९९८ या काळात या घरी वास्तव्यास होत्या. त्यानंतर २०१५पासून आयुष्याच्या शेवटच्या काळात शीला दीक्षित यांचं याच घरात वास्तव्य होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi to shift on sheela dikshit house pmw