Sam Pitroda : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांनी पक्षदेखील अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘चीनला आपला शत्रू मानणे योग्य नाही’, ‘मध्यमवर्गाने सर्व गरीब कुटुंबांसाठी किमान उत्पन्नाची हमी देण्यासाठी अधिक कर भरायला हवा’, अशा प्रकारची अनेक वक्तव्य याआधी सॅम पित्रोदा यांनी केलेली आहेत.

दरम्यान, आता सॅम पित्रोदा यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘मी पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा मला घरीच असल्यासारखं वाटलं’, असं विधान सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

सॅम पित्रोदा यांनी काय म्हटलं?

“माझं मत असं आहे की आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये सर्वात प्रथम आपल्या शेजारच्या देशांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण आपल्या शेजारच्या देशांशी संबंध खरोखरच सुधारू शकतो का? मी देखील पाकिस्तानला गेलो होतो, मी तुम्हाला सांगतो की मला घरी असल्यासारखं वाटलं. मी बांगलादेशला गेलो, मी नेपाळला गेलो तेथेही मला मला घरी असल्यासारखं वाटलं. मला परदेशात असल्यासारखं वाटलं नाही”, असं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी काय म्हणाले?

सॅम पित्रोदा यांच्या या विधानाचा व्हिडीओ भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर शेअर करत जोरदार टीका केली आहे. प्रदीप भंडारी यांनी म्हटलं की, “राहुल गांधींचे निळ्या डोळ्यांचे नेते आणि काँग्रेस ओव्हरसीज प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की त्यांना पाकिस्तानमध्ये ‘घरच्यासारखं वाटलं’. २६/११ नंतरही यूपीएने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, यात आश्चर्य नाही. पाकिस्तानचा आवडता आणि काँग्रेसचा पसंतीचा”, असं प्रदीप भंडारी यांनी म्हटलं आहे.

सॅम पित्रोदा यांची अलीकडच्या काही वर्षांतील वादग्रस्त वक्तव्ये

पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडच्या काही वर्षांत पित्रोदांनी अनेक अशी वक्तव्ये केली, जी वादग्रस्त होती.

-२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पित्रोदा यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं होतं की, मध्यमवर्गाने सर्व गरीब कुटुंबांसाठी किमान उत्पन्नाची हमी देण्यासाठी अधिक कर भरायला हवा, त्यांना स्वार्थी होऊन जमणार नाही. या विधनानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना स्पष्ट करावे लागले की, काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास मध्यमवर्गावर अतिरिक्त कराचा बोजा वाढणार नाही.

-जून २०२३ मध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत अमेरिकेत एका कार्यक्रमात पित्रोदा म्हणाले होते की, “आम्हाला बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याची समस्या आहे, या गोष्टींवर कोणी बोलत नाही. पण, प्रत्येक जण राम, हनुमान आणि मंदिराबद्दल बोलतो, मंदिरे रोजगार निर्माण करणार नाहीत.”

-सॅम पित्रोदा म्हणाले होते की, “जेव्हा संपूर्ण देश राम मंदिर आणि रामजन्मभूमीवरच बोलत असतो, तेव्हा मला त्रास होतो. माझ्यासाठी धर्म ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे आणि राष्ट्रीय समस्या म्हणजे शिक्षण, रोजगारवाढ, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण आहेत; पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही”, असे पित्रोदा म्हणाले होते.