काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘काळी जादू’ विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी अंधश्रद्धेच्या गोष्टींचा उल्लेख करत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करु नये अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने ‘काळी वस्त्रे’ परिधान करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळी जादू’ असं केलं आहे. काँग्रेसने कितीही ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काळय़ा जादू’मुळे तुमचे नैराश्य दूर होणार नाही! ; नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर उपरोधिक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील महागाई, बेराजगारी दिसत नाहीये का? अशी विचारणा राहुल गांधींनी केली आहे. “पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावू नका आणि देशाला काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्यं लपवू नका,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

तुम्हाला लोकांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदी काय म्हणाले –

पानिपत येथील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. काही जण सध्या खूप नैराश्यात आहेत. नैराश्य दूर करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी त्यांनी ‘काळी जादू’ केली, असं पंतप्रधान म्हणाले. त्यास ५ ऑगस्ट रोजी काँग्रेसने काळी वस्त्रे परिधान करून केलेल्या आंदोलनाचा संदर्भ होता.

‘‘काही लोकांनी ५ ऑगस्ट रोजी ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वाटते की काळी वस्त्रे परिधान केली तर आपल्या सर्व समस्या सुटतील, नैराश्य दूर होईल. पण जादूटोणा, काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेत गुंतून ते जनतेचा विश्वास मिळवू शकत नाही,’’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘‘सध्या तुमचे वाईट दिवस चालू आहेत. पण काळी जादू केल्याने तुमचे वाईट दिवस संपणार नाही, हे लक्षात असू द्या,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

आम आदमी पक्षाच्या ‘मोफत’ धोरणाचाही पंतप्रधानांनी समाचार घेतला. जे मोफत देण्याचं वचन देतात, त्यांना नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधने कधीच सापडणार नाहीत, असं ते म्हणाले. ‘‘ मोफत धोरण योग्य नसून दिशाभूल करणारं आहे. ते राष्ट्रहिताचं नाही तर राष्ट्राच्या विरोधात आहे. मोफत धोरणामुळे नवी गुंतवणूक होणार नसून हे धोरण राष्ट्राला मागे ढकलणारं आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rahul gandhi on pm narendra modi over black magic comment sgy
First published on: 11-08-2022 at 14:24 IST