लोकसभेची निवडणूक सुरु असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडमध्ये ९ ठिकणी छापे टाकले असून यामध्ये कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. झारखंड सरकारमधील एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी २०२३ मध्ये ईडीकडून अटक झाली होती. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच दरम्यान, झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीने छापेमारी केली असता २० कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडली आहे. त्यामुळे एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यामध्ये मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरातील काम करणाऱ्या नोकराच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने मोठा दावा केला आहे. स्वीय सचिव संजीव लाल यांनी याआधी भाजपाच्या मंत्र्यांच्या स्वीय सचिव म्हणून काम पाहिले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : मंत्र्यांच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही चक्रावले!

संजीव लाल यांच्या घरातील काम करणाऱ्या नोकराच्या घरातून कोट्यवधींची रोकड ईडीने जप्त केल्यानंतर मंत्री आलमगीर आलम यांनी आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. अशी माहिती झारखंड काँग्रेसचे प्रवक्ते राकेश सिन्हा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली असल्याचे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, कोणत्याही मंत्र्याला दोन सचिव असतात. त्यामध्ये एक खासगी आणि दुसरा सरकारी अधिकारी असतो. यामध्ये संजीव लाल हे सरकारी आहेत. मात्र, यापूर्वी ते भाजपाचे माजी मंत्री सी पी सिंग यांचेही सचिव होते, असे राकेश सिन्हा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

“आलमगीर आलम यांनी मला (राकेश सिन्हा यांना) सांगितले की, या कारवाईशी आणि जप्त करण्यात आलेल्या पैशाची आपला कोणताही संबंध नाही. राहुल गांधी यांचा झारखंडमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दौरा आहे. ते मंगळवारी झारखंडमध्ये येणार आहेत”, असे राकेश सिन्हा यांनी म्हटले आहे. दरम्यान, २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यमंत्री राहिलेले भाजपा आमदार सीपी सिंग यांनीही इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले की, “मंत्रीपदाच्या कार्यकाळात माझे सचिव संजीव लाल होते. मात्र, त्यांच्यापासून मी खूप सावध होतो. तसेच माझ्या कार्यकाळात त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार आली नव्हती”, असे सीपी सिंग यांनी स्पष्ट केले.

आलमगीर आलम कोण आहेत?

पाकूर विधानसभा मतदारसंघाचे आलमगीर आलम हे काँग्रेसचे आमदार आहेत. सध्या ते झारखंड सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत. तसेच २००६ ते २००९ या दरम्यान ते झारखंड विधानसभेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. आलमगीर आलम हे चारवेळा आमदर म्हणून निवडून आलेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress reaction to ed action jharkhand and minister alamgir alam private secretary sanjiv lal 20 crore seized from house gkt