गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आधी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पंतप्रधानांनी संसदेत अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना काँग्रेस सरकारनंच पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आपल्याच लोकांवर बॉम्ब फेकल्याचा गंभीर आरोप केला. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाली असताना भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय व काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यात ट्विटरवर यावरून जुंपली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित मालवीय यांचं ट्वीट आणि आरोप

या सगळ्या वादाला सुरुवात अमित मालवीय यांच्या एका ट्वीटवरून झाली. अमित मालवीय यांनी सोमवारी सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांचं नाव घेत एक ट्वीट केलं होतं. यामध्ये ५ मार्च १९६६ रोजी त्यांनी मिझोरामची राजधानी आयझॉलवर बॉम्ब फेकल्याचा दावा केला.

“राजेश पायलट व सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेच्या त्या विमानांमध्ये पायलट होते, ज्यांनी ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामची राजधानी आयझॉलवर बॉम्बफेक केली. त्यानंतर दोघं काँग्रेसच्या तिकिटावर खासदार आणि सरकारमध्ये मंत्रीही बनले. त्यामुळे हे स्पष्ट आहे की पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आपल्याच लोकांवर हवाई हल्ला करणाऱ्यांना इंदिरा गांधींनी बक्षीस म्हणून राजकारणात जागा दिली, सन्मान केला”, असं या ट्वीटमध्ये अमित मालवीय यांनी नमूद केलं आहे.

सचिन पायलट यांचं प्रत्युत्तर

दरम्यान, अमित मालवीय यांनी केलेल्या आरोपांवर सचिन पायलट यांनी ट्विटरवरच प्रत्युत्तर दिलं आहे. या ट्वीटमध्ये सचिन पायलट यांनी अमित मालवीय यांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच, आपले वडील त्या दिवशी सेवेत नव्हतेच, असंही म्हटलं आहे.

“अमित मालवीय… तुमच्याकडे चुकीच्या तारखा व चुकीची माहिती आहे. भारतीय वायुसेनेचे वैमानिक म्हणून माझ्या वडिलांनी बॉम्बफेक केली हे खरं आहे. पण ते १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये केलं आहे. तुम्ही दावा केल्याप्रमाणे ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामवर नाही. त्यांना भारतीय वायुसेनेत २९ ऑक्टोबर १९६६ रोजी रुजू करून घेण्यात आलं होतं. ८० च्या दशकात एक राजकीय नेते म्हणून मिझोराममध्ये युद्धाला पूर्णविराम देऊन शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती”, असं सचिन पायलट यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या दोघांच्या ट्विटरवरील चर्चेनंतर अमित मालवीय व सचिन पायलट ही दोन्ही नावं ट्विटरवर ट्रेंडिंगलाही आल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sachin pilot slams amit malviya bjp it cell chief on mizoram bombing claim pmw