विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीनं देशातील काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांवर (अँकर्स) बहिष्कार टाकला आहे. या वृत्तनिवेदकांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष आपले प्रतिनिधी पाठवणार नाहीत. यावरून भाजपा नेते, संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकून काहीही फायदा होणार नाही. काँग्रेसनं राहुल गांधी यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. याने पक्षाला काहीतरी फायदा होईल, असं टीकास्र संबित पात्रा यांनी सोडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबित पात्रा म्हणाले, “काँग्रेसनं स्वत:च्या फायद्यासाठी राहुल गांधीवर बहिष्कार टाकला पाहिजे. तुमच्या नेत्यात ताकद नाही. तुम्ही कोणा, कोणावर बहिष्कार टाकणार? बहिष्कार टाकूनच पुढं जायचं, असेल तर तुमच्या नेत्यावर बहिष्कार टाका. काँग्रेस नेते ‘मोहब्बत’ ( प्रेम ) की दुकान बोलतात. पण, ‘नफरत’ ( द्वेष ) विकण्याचं काम करतात.”

“भारतातील अशी कोणतीही संस्था नाही, ज्यावर विरोधकांनी टीका केली नाही. त्यात निवडणूक आयोगापासून न्यायालयाचा समावेश आहे,” असं संबित पात्रा यांनी सांगितलं.

हेही वाचा : मोदी पुन्हा जिंकले नाहीत तर घुसखोरांचे राज्य : शहा

दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीतील वेगवेगळे पक्ष एकूण ११ राज्यांत सत्तेत आहेत. या सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकला आहे.

हेही वाचा : हिंसाचाराच्या आगीत भाजपकडून तेल -खरगे; काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीत निवडणुकांसंदर्भात विचारमंथन

याबाबत काँग्रेस माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी भूमिका मांडली आहे. “रोज संध्याकाळी ५ वाजता काही वृत्तवाहिन्यांवर द्वेषाचा बाजार सुरू होतो. गेल्या नऊ वर्षांपासून हे घडत आहे. या बाजारात वेगवेगळ्या पक्षाचे वक्ते जातात. यात काही तज्ज्ञ, काही विश्लेषक असतात. हे सर्व जण या बाजाराचा एक भाग होऊन जातात. जड अंत:करणाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही या कोणत्याही वृत्तनिवेदकाला विरोध करत नाही. आम्ही त्यांचा द्वेषही करत नाही. मात्र, आम्हाला या द्वेषाचा भाग बनायचं नाही. आम्ही आमच्या देशावर खूप प्रेम करतो. त्यामुळे या द्वेषाला थांबवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. याच कारणामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असे पवन खेरा यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress want to benefit should boycott rahul gandhi not journalist say sambit patra ssa