पीटीआय, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकार यमुना नदीचे प्रदूषित पाणी दिल्लीकरांना देत असल्याचा आरोप केला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सबळ पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तर केजरीवाल यांनी निवडणूक आयोग भाजपचा हस्तक असल्याचा आरोप केला.
केजरीवाल यांनी शुक्रवार ३१ जानेवारी रोजी ११ पर्यंत तथ्य सादर न केल्यास निर्णय देणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. बुधवारी निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर देताना केजरीवाल यांनी हरियाणा सरकार यमुनेत विष मिसळत असल्याचा दावा केला होता. तसेच भाजपशासित राज्यातून मिळणारे पाणी मानवी आरोग्यासाठी ‘अत्यंत धोकादायक, दूषित आणि विषारी’ असल्याचा दावा केला होता.
‘काँग्रेसचे भाजपशी संगनमत’
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांनी छापा टाकल्याचा आरोप मुख्यमंत्री अतिशी यांनी केला होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी मात्र असा कोणताही छापा टाकला नसल्याचे स्पष्ट केले. आम आदमी पक्षाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे भाजपशी संगनमत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी चित्रवाणी संदेशात केला. भाजप सत्तेत आल्यास आप सरकारच्या कल्याणकारी योजना बंद होतील, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा अखेरचा आठवडा असून भाजपविरोधात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस धावून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस सर्वच्या सर्व ७० जागांवर लढत असला तरी पक्षाने फक्त ७-८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘आप’विरोधात राहुल गांधी अचानक आक्रमक झाले असले तरी, त्यामागे काँग्रेसचा स्वत:ची ४ टक्के मते कायम राखण्याचा प्रयत्न आहे. त्याचा ‘आप’ला अधिक फायदा होऊ शकेल असे मानले जात आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. पण, ‘आप’विरोधातील काँग्रेसची प्रचारातील आघाडी टिकू शकली नाही.तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, ‘द्रमुक’चे सर्वेसर्वा स्टॅलिन या सगळ्यांनी ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला. दिल्लीमध्ये भाजपविरोधात स्वबळावर जिंकण्याची काँग्रेसकडे क्षमता नसल्याने ‘आप’चे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी राहुल गांधी व त्यांच्या सल्लागारांना केली होती व स्टॅलिन यांनी राहुल गांधींना फोन केला होता अशी चर्चा दिल्लीत रंगली.
‘केजरीवाल हे मोदींपेक्षा धूर्त’
अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा धूर्त आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. बडली मतदारसंघातील प्रचारसभेत राहुल यांनी काँग्रेस भाजपशी कधीही युती करणार नाही याचा निर्वाळा दिला. यमुनेच्या पाण्यावरून जो वाद सुरू आहे, तो पाहता केजरीवाल यांच्या कामातील फोलपणा उघड होतो, असा टोला लगावला.
मत वाया घालवू नका अखिलेश
भाजपला पराभूत करण्यासाठी आम आदमी पक्षालाच मतदान करा, आपले मत वाया घालवू नका, असे आवाहन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले. दिल्लीत आपला पाठिंबा देण्यासाठी रोड शोमध्ये यादव सहभागी झाले होते. दिल्ली सरकारने शिक्षण तसेच आरोग्याच्या क्षेत्रात उत्तम काम केल्याचे प्रशस्तिपत्रक त्यांनी दिले. त्यांनी काँग्रेसचा नामोल्लेख केला नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता नष्ट केली आहे. निवृत्तीनंतर ते काही पद मिळवू इच्छित आहेत. त्यामुळे नोटीस बजावून ते राजकारण करीत आहेत. आयोगाचे जे नुकसान राजीव कुमार यांनी केले आहे ते अन्य कोणीच केले नाही. त्यांची इच्छा असेल तर ते दिल्ली विधानसभा मतदारसंघात कुठूनही निवडणूक लढवू शकतात.– अरविंद केजरीवाल, संयोजक, आप.
अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि दिल्लीतील लोकांची माफी मागावी. यमुनेतील प्रदूषणाबद्दल त्यांचे अपयश उघड झाले आहे. जबाबदारी घेण्याऐवजी ते भाजपला दोष देत आहेत. दिल्ली सरकारने राजकीय फायद्यासाठी लोकांमध्ये भीती पसरवण्यास सुरुवात केली आहे.– जे.पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप
© The Indian Express (P) Ltd