Delhi Next CM Update: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीच्या विधानसभेत आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला ४८ जागा मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. आता दिल्लीत लवकरच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत सध्या मोठी चर्चा सुरु आहे. दिल्लीचं मुख्यमंत्री कोण असणार? हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. या अनुषंगाने सोमवारी (१७ फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी ३ वाजता होणार असल्याचं वृत्त एएनआयच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार? हे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री ठरल्यास नवीन सरकारचा शपथविधी सोहळा १८ किंवा १९ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती देखील सांगितली जात आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा ८ फेब्रुवारी म्हणजे निकालाच्या दिवसापासून सुरु आहे. परवेश वर्मा, आशीष सूद आणि रेखा गुप्ता यांच्यासह अनेक नावांची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी सुरू आहे. मात्र, याबाबत पक्ष नेतृत्व अद्याप मौन बाळगून आहेत. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी महिलेला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याच्या किंवा पूर्णपणे नवीन चेहरा निवडण्यासंदर्भातले संकेत देखील दिलेले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार? हे उद्याच्या बैठकीनंतर समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या नव्या सरकारमध्ये प्रमुख मंत्रिपदासाठी १५ आमदारांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह आदी महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीत दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपाचे सर्व ४८ नवनिर्वाचित आमदार सोमवारी दिल्ली भाजपाच्या कार्यालयात दाखल होतील. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर सरकार स्थापनेचा शपथविधीची तारीख ठरण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi next cm update who will be the new chief minister of delhi when will the swearing in of the new government big information ahead gkt