Dolo 650 ही गोळी भारतीयांच्या हातात किमान एकदा तरी पडली असण्याची शक्यता व्यक्त करता यावी, इतकी ही गोळी सर्वश्रुत आहे. करोनाच्या काळात तर रेमडेसिवीरच्या आधी डोलो ६५० हे नाव सर्वांना मुखोद्गत झालं होतं. घराघरात माहिती असणारी डोलो ६५० सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे! अमेरिकेत राहणारे एक डॉक्टर पलानीअप्पन मनिकम यांनी दोन दिवसांपूर्वी एक्सवर केलेली एक पोस्ट अचानक व्हायरल होऊ लागली आणि भारतीयांच्या एका सवयीवर बोट ठेवलं जाऊ लागलं!
डॉ. पलानीअप्पन मनिकम नावाच्या व्यक्तीने डोलो ६५० गोळीसंदर्भात १४ एप्रिल रोजी एक सोशल पोस्ट शेअर केली. “भारतीय लोक डोलो ६५० गोळी कॅडबरी जेम्सच्या गोळ्यांसारखी खातात” अशी पोस्ट पलानीअप्पन मनिकन यांनी शेअर केली आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. या पोस्टला सदर वृत्त प्रकाशित करेपर्यंत २० हजारहून अधिक युजर्सनं लाईक केलं असून १४०० हून अधिक युजर्नसं रीपोस्ट केलं आहे.
Dolo 650… अतिसेवन त्रासदायक?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. पाल यांनी वरच्या पोस्टनंतर एका ट्वीटवर दिलेल्या उत्तरात डोलो ६५० चे तोटे नमूद केले आहेत. “डोलो ६५० ही काही कँडी नाही. याच्या अतिसेवनामुळे आपल्याला असणाऱ्या खऱ्या आजारांचं निदान होण्यास उशीर लागू शकतो. त्यातून उपचारांना होणारा विलंब त्रासदायक ठरू शकतो”, असं डॉ. पाल यांनी नमूद केलं आहे.

सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ!

दरम्यान, डोलो ६५० गोळ्यांबाबत डॉ. पाल यांनी केलेली पोस्ट व्हायरल होताच त्यावरून सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. एका यूजरनं “नो लाईफ, नो रिग्रेट, डोलो ६५० इज इंडियाज स्नॅक” म्हणत भारतीयांसाठी डोलो स्नॅक्स असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरनं रजनीकांत यांची GIF पोस्ट करून डोलोबाबत मेसेज शेअर केला आहे. “भारत आता इंधनावर चालत नाही. भारत मोफतचा सल्ला आणि डोलो ६५० वर चालतो”, अशी पोस्ट या युजरनं केली आहे.

एका युजरनं भारतीय “तुम्ही कसे आहात” असं न विचारता “डोलो ६५० घेतली का?” असा प्रश्न विचारतात असं म्हटलं आहे.

एका युजरनं तर भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपीला डोलो ६५० चा गुप्तपणे हातभार लागत असल्याचीही पोस्ट केली आहे!

कोण आहेत डॉ. पलानीअप्पन मनिकम?

डॉ. पलानीअप्पन मनिकम यांना सोशल मीडियावर डॉ. पाल नावानेही ओळखलं जातं. ते मूळचे भारतीय असून मदुराईचे आहेत. सध्या ते कॅलिफोर्नियामध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करत असून दोन प्रकारच्या गोष्टींमुळे चर्चेत आहेत. एक तर ते कुशल गॅस्टोरएन्टरोलॉजिस्ट आहेत. आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते स्टँडअप कॉमेडियन आहेत. ‘मेड-कॉम’ अर्थात वैद्यकीय विषयांसंदर्भातील विनोद निर्मितीमुळे ते चर्चेत येऊ लागले आहेत. विनोदी पद्धतीने वैद्यकीय सल्ले देण्यात ते वाकबगार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dolo 650 trending in india after dr palaniappan manickam social post viral pmw