पीटीआय, न्यूयॉर्क
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबरोबर व्यापार करार झाल्याची घोषणा करतानाच दक्षिण आशियायी देशांमधील तेलाचे सर्वांत मोठे राखीव साठे तयार करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानबरोबर काम करेल, असे वक्तव्य केले. एक दिवस कदाचित पाकिस्तान भारताला तेल विकेल, अशी खोचक टिप्पणीही ट्रम्प यांनी केली.

भारतावर २५ टक्के आयातशुल्काची घोषणा केल्यानंतर काही तासांनी पाकिस्तानबरोबर कराराची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी घोषणा केलेले तेलाचे मोठे राखीव साठे म्हणजे नेमके काय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करून ऐतिहासिक कराराबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. तसेच, दोन्ही देशांतील सहकार्य विस्तारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानचे अर्थमंत्री महंमद औरंगजेब आणि अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांच्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीमध्ये व्यापार करार करण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांतील द्विस्तरावरील व्यापारात वृद्धी होणार आहे.