पीटीआय, कोलकाता

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे नियम पाळावेत आणि रात्री उशिरा बाहेर जाऊ नये, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केले. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला असून भाजप, काँग्रेस, माकपच्या नेत्यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या ओडिशातील एका विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री मैत्रिणीबरोबर जेवायला बाहेर गेली असताना सामूहिक बलात्कार झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना बॅनर्जी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले. आपत्तीग्रस्त उत्तर बंगालमध्ये मदत आणि पुनर्वसन कामाचा आढावा घेण्यासाठी जाण्यापूर्वी त्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलत होत्या. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनी, विशेषतः ज्या राज्याबाहेरून शिक्षण घेण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आल्या आहेत, त्यांनी वसतिगृहाचे नियम पाळणे अपेक्षित आहे. विद्यार्थिनींना हवे तिथे जाण्याचा मूलभूत अधिकार असला तरी त्यांनी उशिरा बाहेर पडणे टाळावे. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना काही मर्यादा आहेत. रात्री कोण घराबाहेर पडत आहे हे पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नसते आणि ते प्रत्येक घराचे ते रक्षण करू शकत नाहीत, असे ममता म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अशा गुन्ह्यांबद्दलच्या ‘निवडक आक्रोशा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांची तुलना बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशामधील प्रकरणांशी केली. उत्तर प्रदेशात न्यायालयात जाताना पीडितांना जाळले जाते, ओडिशामध्ये, समुद्रकिनाऱ्यावर मुलींवर बलात्कार करण्यात आला, तिथे काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी केला.

‘धक्कादायक’ घटना, ‘ती’ संस्थाही जबाबदार

बॅनर्जी यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे सांगतानाच कोणत्याही आरोपीला सोडणार नसल्याचेही ठणकावले. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पोलीस इतरांचा शोध घेत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. तसेच ज्या संस्थेत ती विद्यार्थिनी होती ती संस्थादेखील या घटनेसाठी जबाबदार आहे. खासगी महाविद्यालयांनी त्यांच्या परिसरात सुरक्षा निश्चित केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

तिघांना अटक, एक ताब्यात

सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून या घटनेत सहभागी असलेल्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही. या सर्वांची कसून चौकशी सुरू असून त्यांचे मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी पीडितेच्या मोबाइल फोनचा वापर करून दुसऱ्या आरोपीला घटनास्थळी बोलावले, ज्यामुळे त्यांना सर्व आरोपींचे मोबाइल क्रमांक ओळखण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांची टीका

वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी आणि ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याप्रकरणी विरोधकांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगाल गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे आणि राज्य आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नसल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) केला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष भाजप आणि काँग्रेसने रविवारी पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी निदर्शने केली. भाजप समर्थकांनी आसनसोल दक्षिण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि धरणे दिले. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.