काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान पक्षावर गेल्या काही काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी काँग्रेस पक्षाने प्रचार समिती तयार केली होती. यामध्ये ११ नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या समितीचे स्थायी सदस्य होतेय. तारिक हमीद कारा यांची प्रचार समितीचे उपाध्यक्ष तर जीएम सरुरी यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सोनिया गांधींच्या अध्यक्षपदावर जी-२३ गटाची नेमकी भूमिका काय? गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही महिन्यांत..!”

सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद आधीच पक्षाच्या अखिल भारतीय राजकीय घडामोडी समितीचे सदस्य असल्याने यावर त्यांचा आक्षेप आहे. गुलाम नबी आझाद पक्षाचे दिग्गज नेते असून माजी मुख्यमंत्रीदेखील आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं असून, पक्षाची अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता.

“कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली”, गुलाम नबी आझाद यांची पद्मभूषण मिळाल्यानंतर सूचक प्रतिक्रिया; रोख नेमका कुणाकडे?

आपले जवळचे सहकारी गुलाम अहमद मीर पक्षाच्या जम्मू काश्मीर विभागाच्या प्रमुखपदावरुन बाजूली झाल्यानंतर काही तासातच गुलाम नबी आझाद यांनीदेखील पद सोडलं. गेल्या महिन्यात गुलाम अहमद मीर पायउतार झाले होते. पक्षाने संघटनात्मक फेरफार केले असून मीर यांच्या जागी विकार रसूल वाणी यांची नियुक्ती केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghulam nabi azad resigns from head of jammu and kashmir congress campaign committee sgy