Donald Trump Praises India: भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा केला आहे. तसेच नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प योग्य उमेदवार होते, असाही पुनरुच्चार केला. इजिप्तमध्ये आयोजित केलेल्या गाझा शांतता परिषदेत शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताचा उल्लेख करत माझ्या मित्रयादीत भारत सर्वात वरच्या स्थानावर आहे, असे म्हटले.

विशेष म्हणजे शाहबाज शरीफ ट्रम्प यांच्या मागेच उभे असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची स्तुती केली. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेला उपस्थित नसतानाही त्यांच्या अपरोक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोप, मध्य आशिया आणि इतर देशांच्या जागतिक नेत्यांसमोर भारताचे कौतुक केल्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर सपशेल आपटल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे गाझा शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेत गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

ट्रम्प यांनी शरीफ यांच्याकडे वळून पाहिले…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची स्तुती करताना म्हटले, “माझ्या मित्र यादीत भारताचे स्थान सर्वात वर आहे. त्यांनी नुकतेच एक अतिशय उत्तम काम केले आहे. मला वाटते पाकिस्तान आणि भारत चांगल्या पद्धतीने एकत्र राहत आहेत.” हे विधान केल्यानंतर ट्रम्प यांनी मागे वळून शाहबाज शरीफ यांच्याकडे पाहिले आणि विचारले, “बरोबर ना?”

पाहा व्हिडीओ –

डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे वळून अचानक प्रश्न विचारल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काही क्षण गोंधळले. मात्र त्यांनी हसत हसत होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर त्यांनी हात उंचावून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. ट्रम्प पुढे म्हणाले, “ते (भारत-पाकिस्तान) चांगले मित्र आहेत आणि दोघेही महान आहेत.”

शाहबाज शरीफ यांच्याकडून ट्रम्प यांचे कौतुक

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. मात्र हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांचा जयजयकार करत त्यांना नोबेल पारितोषिक मिळावे, यासाठी नामांकन देणार असल्याचे सांगितले.

या परिषदेत गाझा शांतता करारावर इजिप्त, कतार आणि तुर्की आदी मध्यस्थ देशांनी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत स्वाक्षऱ्या केल्या. या परिषदेला भारतासह २०पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिखर परिषदेत सिसी यांनी उपस्थितांना संबोधित करताना पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकार असल्याचे निक्षून सांगितले. या भाषणादरम्यानच सिसी यांनी इजिप्तमधील ‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करत असल्याचे जाहीर केले.