Gurugram News : गुडगावमध्ये एका ५ वर्षांच्या मुलाचा सोसायटीच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुडगावमधील सेक्टर ३७ डी मधील बीपीटीपी पार्क सरीन सोसायटीमध्ये ही घटना घडली. या सोसायटी व्यवस्थापनाच्या आणि लाईफ गार्डच्या दुर्लक्षामुळे स्वीमिंग पूलमध्ये बुडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
पार्क सरीन सोसायटी आरडब्ल्यूएचे अध्यक्ष आणि सोसायटीतील रहिवासी यांच्या माहितीनुसार, सोसायटीच्या जे टॉवरमध्ये राहणाऱ्या बिन्नी सिंगला यांचा ५ वर्षीय मुलगा मिवंश सिंगला हा सनसिटी स्कूलमध्ये शिकत होता. बुधवारी सायंकाळी मिवंश हा त्याची आजी रमा सिंगला यांच्याबरोबर सोसायटीत असणाऱ्या स्वीमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी गेला होता. त्या ठिकाणी लहान मुलांसाठी बनवलेल्या तलावात आंघोळ करत होता. मात्र, याचवेळी रमा सिंगला या मिवंशसाठी काही वस्तू घेण्यासाठी दुसरीकडे गेल्या.
हेही वाचा : कंगना रणौत यांची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान, न्यायमूर्तींनी नोटीसही पाठवली!
यावेळी रमा सिंगला यांनी लाइफ गार्ड आणि सुरक्षा रक्षकाला मुलगा मिवंश याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. पण लाइफ गार्ड आणि सुरक्षा रक्षकांनी दुर्लक्ष केलं. मिवंश सुमारे ४ फूट पाण्यात गेला आणि तेथे त्याचा बुडून मृत्यू झाला. पण तरीही सुरक्षा रक्षकानी त्या मुलाकडे पाहिलं नाही. यानंतर मिवंशचा मृतदेह पाण्यात तरंगताना दुसऱ्या काही मुलांनी पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. १० मिनिटे या मुलाचा मृतदेह तलावात तरंगत राहिला. यानंतर इतर मुलांनी हे दृश्य पाहिल्यावर सुरक्षारक्षकाला माहिती देण्यात आल्यानंतर ही घटना समोर आली.
दरम्यान, मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केलं. यानंतर या सोसायटीत असणाऱ्या रहिवाशांनी बिल्डरच्या मेंटेनन्स एजन्सीच्या आणि गार्डच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
तसेच बिल्डरच्या व्यवस्थापन कंपनीने तैनात केलेले लाईफ गार्ड आणि सुरक्षा रक्षक हे केवळ दिखावाच आहेत, असा आरोप सोसायटीमधील रहिवाशांनी केला आहे. सुरक्षा रक्षक हे मोबाईलवर व्यग्र असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. जर सुरक्षा रक्षक सतर्क राहिले असते तर मुलाला वाचवता आले असते, अशी भावना आता रहिवाशी व्यक्त करत आहेत. दरम्यान, पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवायला हवं, लहान मुलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, असं आवाहन आता करण्यात येत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd