ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज म्हणजेच २० मे २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी आपली बाजू मांडण्यासाठी अधिक वेळ मागितला. त्यावर न्यायालयाने २० मेला दुपारी ३ वाजता सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी सर्व पक्षांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेनं ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. शिवसेनेनं २०२४ ची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांऐवजी ज्ञानवापीसारख्या धार्मिक मुद्द्यांवर लढवली जाणार असल्याचं सांगतानाच हे सर्व प्रकरण म्हणजे, ‘२०२४ चे उत्खनन सुरु?’ असा प्रकार आहे का अशी शंका उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचा मूळ रामायण-महाभारताशी काहीच संबंध नसतो, पण…
“सध्या वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा भाजपाने अजेंड्यावर घेतलेला दिसतो. प्रकरण न्यायालयात सुरूच आहे. मंदिर की मशीद, याचे उत्खनन कोर्टाच्या सर्व्हेअरने केल्यावर मशिदीच्या जागेत शिवलिंग सापडल्याचे सांगितले गेले. याचदरम्यान भाजपा गोटातून असे प्रसिद्ध झाले आहे की, योगी आदित्यनाथ हे लखनौचे लक्ष्मणपूर असे नामकरण करणार आहेत. भाजपाच्या विकासाचे मॉडेल हे अशा पद्धतीने सुरू आहे. हनुमान चालिसा, भोंगा प्रकरण फारसे चालले नाही. प्रत्येक वेळी एखादी नवी रामकथा किंवा कृष्णकथा रचायची. त्याचा मूळ रामायण-महाभारताशी काहीच संबंध नसतो, पण लोकांना उचकत बसायचे असे उद्योग चालले आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

यालाच काही लोक विकास समजत असतील तर…
“ताजमहालच्या जमिनीखाली काय दडलंय तेसुद्धा खणून काढा, अशी मागणी यांच्यापैकीच काही जणांनी करावी ही गंमत आहे. ताजमहालप्रकरणी कोर्टाने याचिकाकर्त्यास फटकारले आहे. त्याच वेळी दिल्लीच्या जामा मशिदीवरही भाजपाच्या साक्षी महाराजांनी दावा सांगितला आहे. जग कोठे चालले आहे व आपण काय करीत आहोत? कैलास पर्वत हे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान. कैलास पर्वतावर भगवान शिवजी विराजमान आहेत. त्या कैलास पर्वतावर चीनचा ताबा आहे आणि भक्त मंडळी शिवजींना ताजमहालखाली शोधत आहेत. नव्या पिढीच्या हाती सध्याचे राज्यकर्ते नेमके काय ठेवणार आहेत? साडेसहा कोटी लोकसंख्येचा फ्रान्स देश ‘राफेल’ बनवून आम्हाला विकत आहे आणि १३० कोटींचा देश रोज मंदिर-मशिदी आणि थडग्यांचे उत्खनन करीत आहे. यालाच काही लोक विकास समजत असतील तर त्यांना साष्टांग दंडवत,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते…
“अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहत आहे. त्यासाठी बाबरीचा ढाचा पाडावा लागला. त्याकामी हजारो कारसेवकांना बलिदान द्यावे लागले. आता नव्याने असेच काही मुद्दे उकरून काढून देशभरात दंगली घडविल्या जातील व त्याच भावनेवर २०२४ च्या निवडणुका लढविल्या जातील, अशी भीती ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी राममंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘‘एखाद्याच्या मनात कसलीही कडवट भावना असेल तर ती विसरण्याचा हा दिवस आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले व ते योग्यच होते,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

संघाच्या भूमिकेबद्दलही शंका…
“त्याच (अयोध्यानिकालाच्या) वेळी सरसंघचालकांना ज्ञानवापी मशीद व मथुरेतील ईदगाहबाबत विचारण्यात आले. त्यावर सरसंघचालकांनीही समतोल भूमिका मांडली. ते म्हणाले, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता संघ एक संस्था म्हणून अयोध्या चळवळीशी संलग्न होता. हा एक अपवाद म्हणता येईल. आता आम्ही पुन्हा मानवी विकासाला प्राधान्य देऊ आणि या चळवळी आमच्यासाठी चिंतेचा भाग नसतील, पण जसजशी २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक जवळ येत आहे, तसतसे भूमिकांचे काटे वेगळ्या दिशेने फिरताना दिसत आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं आरएसएसच्या भूमिकेबद्दलही शंका उपस्थित केलीय.

…इतकीच देशाची अपेक्षा आहे
“मथुरा, ज्ञानवापी मशिदींबाबत आता ‘एमआयएम’चे प्रमुख ओवेसी यांनी त्यांच्या पद्धतीने बांग दिली आहे. आणखी एका मशिदीचा बळी आम्ही जाऊ देणार नाही, असा इशारा या महाशयांनी दिला. त्यामुळे २०२४ च्या आधी नेमके काय घडणार व निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर लढविल्या जातील याचा अंदाज येऊ लागला आहे. मथुरेतील ईदगाह व वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा तणाव आणि दंगलींशिवाय सुटावा इतकीच देशाची अपेक्षा आहे,” असंही लेखात म्हटलंय.

शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता…
“न्यायालयातून कोणत्याही प्रकरणी हवा तसा दिलासा मिळवणे सध्याच्या राज्यकर्त्यांना कठीण नाही. त्यामुळे न्यायालयाचा निकाल दोन्ही बाजूंनी बंधनकारक असेल. ‘‘अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है’’ ही घोषणा हिंदुत्ववाद्यांना सुखावणारी आहेच, पण कश्मीर खोऱ्यात हिंदू पंडितांचे जे शिरकाण पुन्हा सुरू झाले आहे, तो विषयही काशी-मथुरेइतकाच गंभीर आहे. त्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक सुरू आहे. उत्तर प्रदेशातील शाळांची दुरवस्था नुकतीच समोर आली आहे. शाळांना भिंती नाहीत, शौचालये नाहीत. त्यामुळे मुले मोकळ्या जागेत शाळा भरवत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मुरादाबादच्या सरकारी प्रायमरी शाळेप्रमाणेच इतरही शाळांची हीच अवस्था आहे. शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता कशी सुधारता येईल यावर फक्त उत्तर प्रदेशात नाही, तर देशभरात विचार करायला हवा,” असा सल्लाही शिवसेनेनं दिलाय.

धर्माच्या नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्ड्यांत…
“मंदिर-मशिदीचे व औरंगजेबाच्या थडग्याचे वाद आपल्या देशात कधीच संपणारे नाहीत. कारण राजकीय भाकऱ्या त्याच आगीवर पेटवल्या जात आहेत, पण या आगीपेक्षा पोटाची आग महत्त्वाची आहे. त्या आगीचा वणवा पेटल्यावर काय होते त्याचे ‘पेटते’ उदाहरण बाजूच्या श्रीलंकेत दिसते आहे. महागाई, भूक, आर्थिक अराजकतेतून निर्माण झालेल्या प्रश्नांवर धार्मिक मुद्दे विजय मिळवू शकले नाहीत, म्हणून मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना सगळ्यांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ‘ऐशी तैशी’ सुरू आहे. देशभरात धर्माच्या नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्ड्यांत देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi mosque case is preparation for 2024 elections shivsena slams bjp and rss scsg
First published on: 20-05-2022 at 07:40 IST